US woman Mumbai taxi scam file photo
मुंबई

US woman Mumbai taxi scam: मुंबईत अमेरिकन महिलेकडून ४०० मीटर प्रवासासाठी घेतले १८ हजार रुपये; टॅक्सी चालकाला अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलपर्यंतच्या अवघ्या ४०० मीटरच्या प्रवासासाठी एका अमेरिकन महिलेकडून १८,००० रुपये घेतल्याचा संतपाजनक प्रकार समोर आला आहे.

मोहन कारंडे

US woman Mumbai taxi scam

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलपर्यंतच्या अवघ्या ४०० मीटरच्या प्रवासासाठी एका अमेरिकन महिलेकडून १८,००० रुपये घेतल्याचा संतपाजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी टॅक्सी चालकाला अटक केली आहे. महिलेने 'एक्स'वर आपला अनुभव शेअर केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले, ज्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई केली.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी रोजी घडली जेव्हा ही महिला अमेरिकेतून मुंबईत आली होती. विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी तिने टॅक्सी भाड्याने घेतली. तिला थेट हॉटेलवर नेण्याऐवजी, चालकाने तिला अंधेरी (पूर्व) भागात सुमारे २० मिनिटे फिरवले आणि शेवटी त्याच हॉटेलवर सोडले. या प्रवासासाठी त्याने तिच्याकडून १८,००० रुपये (सुमारे २०० अमेरिकन डॉलर्स) उकळले. टॅक्सीत चालकासोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे समजते, पोलीस त्या व्यक्तीचा तपास करत आहेत.

सोशल मीडियामुळे कारवाईला वेग

महिलेने २६ जानेवारी रोजी 'एक्स' वर या घटनेची माहिती दिली. चालक आणि त्याच्या साथीदाराने तिला आधी एका अनोळखी ठिकाणी नेले, पैशांची मागणी केली आणि नंतर विमानतळाच्या अगदी जवळ असलेल्या हॉटेलवर सोडले. तिच्या या पोस्टला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांची तत्परता; तीन तासांत टॅक्सी चालकाला अटक

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत २७ जानेवारी रोजी एफआयआर नोंदवला. पोस्टमध्ये दिलेल्या टॅक्सीच्या नोंदणी क्रमांकावरून पोलिसांनी ५० वर्षीय चालक देशराज यादव याला ओळखले. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ८) मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज चालके आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला आणि महिलेने वास्तव्य केलेल्या हॉटेलमधूनही माहिती गोळा केली. तपासात असे समोर आले की, ती महिला १२ जानेवारीला हॉटेलमध्ये आली होती आणि दुसऱ्या दिवशी पुण्यातून अमेरिकेला रवाना झाली. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर अवघ्या तीन तासांत यादवला अटक केली आणि त्याची टॅक्सी जप्त केली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आरटीओला कळवण्यात आले आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणावर बोलताना डीसीपी मनीष कलवानिया म्हणाले, "मुंबई विमानतळावरील एका टॅक्सी चालकाने अमेरिकन महिलेकडून अवाजवी भाडे आकारल्याचे हे प्रकरण आहे. चालकाने तिला विनाकारण फिरवून १८,००० रुपये घेतले. महिलेच्या तक्रारीनंतर आम्ही स्वतःहून गुन्हा नोंदवून देवराज यादव नावाच्या आरोपीला अटक केली आहे."

ते पुढे म्हणाले, "अशी कोणतीही घटना घडल्यास किंवा तुमची फसवणूक झाल्यास, त्वरीत ११२ क्रमांकावर कॉल करा आणि तुमची तक्रार नोंदवा. पोलीस तात्काळ त्याची दखल घेतील. अशा प्रकरणांत पोलिसांना जेवढ्या लवकर माहिती दिली जाईल, तेवढी कारवाई करणे सोपे जाते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT