मुंबई: राज्यात मे आणि जूनमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे २४ जिल्ह्यांतील सुमारे ५६ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल राज्य प्रशासनाने जाहीर केला आहे.
१ मे ते ८ जून २०२६ या कालावधीत राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला. १ जून ते ८ जून या कालावधीतच १० जिल्ह्यांमध्ये १७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तर मेमध्ये ४० हजार २१५ हेक्टर इतके क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
जळगाव, बुलडाणा, सोलापूर आणि अकोला हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित ठरले आहेत. या भागात वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. फळबागांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या पिकांमध्ये केळी, गहू, मका, हरभरा, ज्वारी, कांदा, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, संत्रा, द्राक्ष, आंबा या पिकांचा समावेश आहे. केळी, द्राक्ष आणि डाळिंब यांसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे सुरू असून अंतिम अहवालानंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.