

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवी मुंबईतील विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सिडकोने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले नसल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचे पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजशिष्टाचार सांभाळून निमंत्रण द्यायला हवे होते, ते न दिल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली. यावेळी सेनेच्या मंत्र्यांनी सिडको, राजशिष्टाचार आणि विमानतळ प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
शिवसेनेच्या या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले होते.
काही काळानंतर या विमानतळावरून विमानसेवाही सुरू झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभा करण्याचे निर्देष दिले होते. त्यानंतर त्वरित कामाला सुरुवात झाली आणि अवघ्या पाच महिन्यांमध्ये पुतळा उभा करण्यात यश आले.
नवी मुंबई विमानतळावरील या पुतळ्याचे उद्घाटन अलीकडेच पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वन मंत्री गणेश नाईक, महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह इतर नेते आणि संबंधित मंत्रालयाचे अधिकारी हजर होते.
पण, एकनाथ शिंदे या कार्यक्रमात न दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. हीच नाराजी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पाहायला मिळाली.