मुंबई : चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका वयोवृद्ध पती-पत्नीविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांर्तत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. यातील तक्रारदार महिला वांद्रे येथे राहत असून तिचा पिडीत चौदा वर्षांचा मुलगा आहे. आरोपी तिच्या परिचित असून त्यांच्यात जुना वाद होता. याच वादातून तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांत तक्रार केल्याचा आरोपींच्या मनात राग होता. याच रागातून त्यांनी तिच्या चौदा वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्याला घरी आणून त्याच्यावर जबदस्तीने अनैसर्गिक आणि अश्लील कृत्य करुन अत्याचार केला. त्याने विरोध केल्यानंतर त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली होती.
मुलाकडून तक्रारदार महिलेला हा प्रकार समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार जुहू पोलिसांना सांगून तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी 73 आणि 70 वर्षांचे पती-पत्नी असल्याचे सांगण्यात आले.