मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारून जाहिरात फलक (होर्डिंग) लावल्याप्रकरणी जाहिरातदार अभिषेक चव्हाण यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. तसेच संबंधित लोखंडी संरचना व फलकाचे निष्कासन करून साहित्य जप्त करण्यात आले आहे. अनधिकृत फलक लावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,अशी सक्त ताकीद महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील प्रवेशद्वार क्रमांक-5 च्या दोन्ही बाजूस महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात फलक लावण्यात आले होते. सुमारे 20 बाय 20 फूट आकाराच्या या फलकासाठी दोन्ही ठिकाणी लोखंडी संरचनाही उभारली होती. याविषयी ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून संबंधित जाहिरातदार अभिषेक चव्हाण यांना 29 जानेवारी रोजी नोटीस बजावून अनधिकृत जाहिरात फलक व लोखंडी संरचना तत्काळ हटवण्याची सूचना केली होती.
तथापि, त्यांनी सदर फलक व लोखंडी संरचना न हटवल्याने त्यांच्याविरोधात 30 जानेवारी रोजी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा, बृहन्मुंबई महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 3 व 4 आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 सह कलम 328, 471 अन्वये ही कारवाई करण्यात आली.
जाहिरातदार तसेच संबंधितांनी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिरात फलक (होर्डिंग) लावून विद्रुपीकरण करू नये. अन्यथा, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणतीही हयगय केली जाणार नाही. तसेच,अनधिकृत फलकांविरोधात निष्कासनाची कारवाई नियमितपणे सुरूच राहील, असे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले.