मुंबई : काच, सिरॅमिकसारख्या ठिसूळ पदार्थांमध्ये सूक्ष्म छिद्रे तयार करताना तडा न जाणे हे अभियांत्रिकीतील मोठे आव्हान मानले जाते. या आव्हानावर मात करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संशोधकांनी अल्ट्रा सॉनिक-असिस्टेड इलेक्ट्रो केमिकल डिसचार्ज मशीनिंग या नाविन्यपूर्ण प्रक्रियेचा वापर करून मोठी प्रगती साधली आहे. या तंत्राने सूक्ष्मछिद्रांमधील अवशेष अधिक प्रभावीपणे काढून टाकता येतात, ज्यामुळे ठिसूळ पदार्थांवरील सूक्ष्म ड्रिलिंगची अचूकता आणि कार्यक्षमता वाढते, हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
प्रा. प्रदीप दीक्षित आणि संशोधक अनुराग शानू यांनी केलेल्या या अभ्यासात इलेक्ट्रो लाइट द्रावणाचा प्रवाह आणि पदार्थातील अवशेषांची गतिकी यांचे विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणातून असे दिसून आले की, अल्ट्रा सॉनिक कंपनांच्या आयामामुळे छिद्रांतील अडकलेले अवशेष अधिक सहजपणे बाहेर पडतात आणि ताज्या इलेक्ट्रो लाइटचा प्रवाह कायम राहतो. परिणामी, मशीनिंग प्रक्रियेची कार्यक्षमता 33 टक्क्यांनी वाढते, असे संशोधन निष्कर्ष काढून ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.
काच व सिरॅमिकसारखे पदार्थ विद्युतवाहक असल्यामुळे पारंपरिक इलेक्ट्रिकल डिसचार्ज मशीनिंग किंवा लेझर कटिंग तंत्रे या पदार्थांवर वापरता येत नाहीत. लेझर प्रक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे पदार्थाला तडे जाण्याचा धोका असतो. त्यामुळे ठिसूळ पदार्थांवरील सूक्ष्म ड्रिलिंगसाठी नव्या प्रकारच्या तंत्राची आवश्यकता होती. यामुळेच अशा संशोधनाला भर देत ही काचेवरील प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.
‘अल्ट्रा सॉनिक’ तंत्र नेमके आहे काय?
विकसित केलेले हे अल्ट्रा सॉनिक कंपन आणि इलेक्ट्रो केमिकल डिसचार्ज या दोन्हींच्या संयुक्त क्रियावर आधारित आहे. या प्रक्रियेत विद्युत ठिणग्यांच्या मदतीने पदार्थातील सूक्ष्म भाग बाष्परूपात निघून जातात आणि त्याच वेळी अल्ट्रा सॉनिक लहरी अवशेष बाहेर काढून ड्रिलिंगची अचूकता राखली आहे. हे अगदी नळीत अडकलेला कचरा ‘प्लंजर’ने साफ करण्यासारखे आहे. जशी लयबद्ध दाबाची क्रिया अडथळे दूर करते, तशीच अल्ट्रा सॉनिक लहरी सूक्ष्म छिद्रांतील गाळ आणि चुरा बाहेर फेकतात, असे प्रा. दीक्षित यांनी सांगितले. काच व सिरॅमिकचे उपयोग स्मार्टफोन स्क्रीनपासून वैद्यकीय उपकरणांपर्यंत वाढत असल्याने, या पदार्थांवर अचूक ड्रिलिंग करणे उद्योगक्षेत्रासाठी अत्यंत आवश्यक ठरले आहे.