मुंबई : दोन गुजराती मुंबईला गिळायला निघालेले आहेत. आपण जर तुझे माझे करत बसलो तर आपण लढाई न लढलेली बरी. मुंबई आमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. काहीही झाले तरी आपल्याला ॲनाकोंडा आणि अहमद शाह अब्दालीला आपल्याला हरवायचे आहे, असा हल्ला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या जनसेवेबाबत माहिती देणारी पुस्तिका शिवसेना भवन येथे प्रकाशित केली. त्यावेळी मुंबईतील सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार, खासदार यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाचा आपल्याला वाईट अनुभव आला आहे. भाजपाने फक्त युती तोडली नाही, तर ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. त्यामुळे आता आपल्याला भाजपाला हरवायचे आहे. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल, पण ही निवडणूक आपल्याला जिंकावी लागेल. तुम्ही तुमची निष्ठा विकू नका, सर्व बाजूला ठेवून कामाला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इतकी वर्षे आम्ही लढलो. मुंबई आमच्यापासून कोणीही हिसकावू शकले नाही. यांना कोणीही ओळखत नव्हते, त्या भाजपाला आम्ही खेडोपाडी पोहोचवले. आम्ही ज्यांना मोठे केले, आज तेच लोक आमच्यावर वार करत आहेत. मला तुमच्यापैकी एकही माणूस फुटता कामा नये. तुम्ही माझ्या खुर्चीत बसा आणि विचार करा. तुमच्याशी हे मी आगतिक होऊन बोलत नाही. मला मुंबईसाठी २२७लोकांची निवड करायची आहे. मला नाशिक, पुणे, ठाणे सगळीकडे पाहायचे आहे, त्यामुळे एकजुटीने कामाला लागा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
काही जागा नाइलाजाने सोडाव्या लागतात
मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपा किंवा तत्कालीन जनसंघाचा काडीमात्र संबंध नव्हता. त्यांना मुंबई गुजरातला हवी होती, म्हणून त्यांनी संघर्ष केला. आजपर्यंत भाजपाने आपला दुरुपयोग करून घेतला आहे. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे. आपण मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी मनसेशी युती केली आहे. युती असते, आघाडी होते, तेव्हा १०० टक्के आपल्या मनासारखे होत नसते. काही जागा आपल्या हक्काच्या असतात. परंतु, नाइलाजाने त्या सोडाव्या लागतात, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी जागावाटपात मनसेशी तडजोड करावी लागली असल्याचे संकेत दिले.