Uddhav Thackeray on Eknath Shinde
मुंबई : अंबादास दानवे यांना मी उमेदवारी दिली, तेव्हा अनेकांचे चेहरे पडले होते. यशस्वी विरोध पक्षनेता म्हणून त्यांचे नाव कायम घेतले जाईल. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही. पण तुम्ही त्या ताटाशी प्रतारणा केली नाही, समोरच्या ताटात काही चांगलं दिसलं, म्हणून तिथे गेला नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि संघात तयार झालेला अंबादास दानवे हा कार्यकर्ता मला दिला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असेही ठाकरे म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाल संपला. यावर ते विधान परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पद येतात आणि पद जातात. पण जनतेच्या मनात आपली काय प्रतिमा राहते. हे महत्वाचे असते. आता उल्लेख झाला की दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. पण तुम्ही त्या ताटाशी प्रतारणा केली नाही. समोरच्या ताटात काही चांगलं दिसलं म्हणून तिथे तुम्ही गेला नाहीत, असा टोला ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला. आज दानवे यांची पहिली टर्म संपत आली आहे. परंतु, अंबादास तुम्ही जोरात मी पुन्हा येईन बोला. पण याच पक्षातून पुन्हा येईल, असे बोला, अशी मिश्किल टिप्पणी ठाकरे यांनी यावेळी केली.
काही जण आज दानवे यांचे कौतुक करत असले तरी, त्यावेळी दानवेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. दानवेंच्या रूपाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी चांगला कार्यकर्ता दिल्या बद्दल त्यांचे मी आभार मानतो. मृणाल ताई गोरे कधीही पदासाठी धावल्या नाहीत, पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपला विचार सोडला नाही, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.