

सिंधुदुर्ग: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, भारतीय जनता पक्षाने (भाजप) कोकणातील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बालेकिल्ल्यात मोठे खिंडार पाडले आहे. मालवण नगरपरिषदेतील ठाकरे गटाचे तीन विद्यमान नगरसेवकांनी आज (दि. १४) भाजपमध्ये प्रवेश केल्याने सिंधुदुर्गातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाला. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला आहे. मालवणमधील ठाकरे गटाचे प्रमुख चेहरे असलेल्या नगरसेवकांनी हातात भाजपचे कमळ घेतले आहे. यामध्ये यतीन खोत, मंदार केणी आणि दर्शना कासवकर या नावांचा समावेश आहे. या तीन नगरसेवकांसोबतच सेजल परब - माजी नगरसेविका, भाई कासवकर - शाखा प्रमुख, नंदा सारंग - उपशहर प्रमुख, सई वाघ - शाखा प्रमुख, अमन घोडावले - उपशाखा प्रमुख, संजय कासवकर - शाखा प्रमुख आणि नितीन पवार, शाखा प्रमुख यांनी देखील कोकणातील नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.
रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणून स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी करण्याची भाजपची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरताना दिसत आहे. मालवणमधील या पक्षबदलामुळे आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धक्क्यातून ठाकरे गट स्थानिक पातळीवर कसा सावरतो आणि आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी काय पावले उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.