मुंबई : काही साखरसम्राट भाजपमध्ये गेले आणि शेकडो, करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडून थकहमी मिळवली आहे. जर साखर सम्राटांनी कर्ज बुडविल्यानंतरही त्यांचे कर्ज सरकार भरणार असेल तर गोरगरीब शेतकरी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे कर्ज माफ करणार काय, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)उद्धव ठाकरे यांनी केला. अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकर्यांना एकरी 50 हजार रूपये देण्याची मागणीही ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दसर्याच्या पूर्वसंध्येला मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट आहे. या संकटात राजकारण न आणता आपण सगळे एकत्र होऊन मार्ग काढण्याची गरज आहे. परंतु, सरकारची तशी तयारी दिसत नाही.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी साखरेवर प्रति टन 10 रूपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन 5 रूपये कपात, अशी एकूण 15 रूपयांची कपात केली जाणार आहे. या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकर्यांनाही फटका बसला आहे. अशावेळी कपातीमध्ये तीनपट वाढ केल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होईल, असे ठाकरे म्हणाले.
माणसाच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडवला असून शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी 16 ऑक्टोबर 2020 रोजी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली होती. तेव्हा ओला दुष्काळ ही संज्ञा होती आणि मग तुमचे सरकार आल्यावरती ही संज्ञा काढली का? पदाप्रमाणे शब्द बदलतात का? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.