Uddhav Thackeray
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला ज्या जागा मिळाल्या हा जादूटोणा आहे की काय? असा प्रश्न राऊत यांनी ठाकरेंना विचारला. यावर ठाकरे म्हणाले, कदाचित त्यांनी डायनासोर कापला असेल. जादूटोण्यावर माझा विश्वास नाही. त्यांनी रेडा कापला असेल तर त्या रेड्याचा जीव नाहक गेला, असा मिश्कील टोला लगावला.
राऊत यांनी ठाकरेंना विचारले की, जे तुम्ही लोकसभेला कमावलंत, ते विधानसभेला गमावलंत. फक्त सहा महिन्यांत हे कसं घडलं? यावर ठाकरे म्हणाले, "सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळय़ांवर आता चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आलंय. ‘लाडकी बहीण’सारख्या आता फसव्या ठरलेल्या योजना याचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की, वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाला की, स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ ‘आपल्याला जिंकायचंय’ म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. ‘तू तू मै मै’ झालं. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला. लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसलं तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होतं, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं. ही चूक होती. ती पुढे सुधारली पाहिजे. ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ राहत नाही."
"हिंस्र आणि जंगली यात फरक आहे. हिंस्र हे राजकारणी असतात. जंगली प्राणी म्हणजे हिंस्र नाही. जंगलात कारण नसताना कोणी कोणावर हल्ला करत नाही. वाघ, सिंह हे भूक लागल्याशिवाय शिकार करत नाहीत. तो निसर्ग नियम आहे. ते भुकेपुरतीच शिकार करतात. आज एक मारलं, उद्यासाठी एक मारू असं नाही. प्राणी मारून फ्रीजमध्ये ठेवणं असला प्रकार तिथं नाही. राजकीय पक्ष जसे सत्ता मिळाली तरी आणखी आमदार, खासदार घ्या असं करतात तसं वाघ, सिंह करत नाहीत. हे लोक राजकारण्यांना फोडतात आणि थंड करून सत्तेच्या शीत कपाटात ठेवतात," असे ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आले आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सरकारनंही त्यासाठी काम केलं होतं. सर्वांनी प्रयत्न केले. मात्र आता हे किल्ले युनेस्कोच्या यादीत गेल्यानंतर त्यांची दुरावस्था लोकांना दिसता कामा नये. तिकडे चांगले काम झाले पाहिजे. महाराष्ट्रात आल्यानंतर काय पाहाल हे सांगता आलं पाहिजे. त्या वेळची शिवशाही कशी होती? आमचा राजा, आमचा देव कसा होता, त्याने कसं राज्य केलं, कोणत्या प्रतिकूल काळात त्यांनी लढा दिला आणि हे गडकिल्ले कसे बांधले, त्यांचा उपयोग कसा करून घेतला हे दिसलं पाहिजे," असे ते म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले, "भूगोल आणि इतिहासाचा सुंदर मिलाप या गडकिल्ल्यांत आहे. या किल्ल्यांवर आजही चढून जाणं कठीण आहे. अशा किल्ल्यांवर त्या वेळेला आमचे मावळे, शिवाजी महाराज, स्वतः जिजामाता कशा येत-जात असतील? आज मोबाईल, दिवे… सगळ्या सुविधा आहेत. पटकन संदेश जातात. त्या काळात काहीही नसताना इतक्या दुर्गम भागांत राज्य स्थापन करणं आणि ते चालवणं ही अनाकलनीय गोष्ट आहे. ती आपल्याला कधी कळली नाही आणि ती कधी साधणार नाही."