मुंबई : धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, परंतु कोणीही असहायतेचा गैरफायदा घेऊन, आमिष दाखवून धर्मांतर करीत असेल तर त्याला आमचा विरोध राहील, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. देशात आणि अनेक राज्यांत भाजपचे सरकार असताना धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचे आहे, असा सवाल करत सरकारने याची माहिती द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे बोलत होते. धर्मस्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलेच पाहिजे. पण जोरजबरदस्तीच्या धर्मांतराला आमचा विरोध राहीलच. पण, यातील काही तरतुदींबाबत जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. मात्र, धाकधपटशा दाखवून, ईडी-इन्कम टॅक्सच्या धमक्या देऊन, 50 खोके देतो असे सांगून जर कोणी धर्मांतर करीत असेल तर त्याला आम्ही विरोध करू, असेही ठाकरे म्हणाले.
एलपीजीचा तुटवडा नाही, असे सरकार सांगत असेल तर मग गॅस एजन्सीबाहेर लोकांच्या रांगा का दिसत आहेत, असा सवाल ठाकरेंनी यावेळी केला. मुंबईतीलच 30 ते 40 टक्के रेस्टॉरंट बंद झाली आहेत, तसेच अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व गोष्टींमुळे जनता होरपळत असेल आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत जनतेच्या व्यथा पोहोचत नसतील, त्यांची यंत्रणा सदोष आहे, हे स्पष्ट होते, असा संतापही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
बेळगावात महाराष्ट्र गीत म्हटल्याने मराठी माणसांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, त्यात राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. कोणत्याही भाषेवर कोणत्याही राज्यात दुसरी भाषा लादत अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे कर्नाटक सीमा भागात मराठी भाषकांवर अन्याय होत असेल तर सरकारने यात हस्तक्षेप करत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. हा सीमावाद सोडवण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.