Maharashtra Politics Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: ‘भिऊ नका, मी पाठीशी आहे’ म्हणणाऱ्या मोदींना उद्धव ठाकरेंचा सवाल; ‘हा संदेश नेमका कोणाला?’

शिवसेना पक्षाबाबतची न्यायालयीन सुनावणी अंतिम टप्प्यात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाच्या खासदारांची भेट घेतल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शिवसेना पक्षाबाबतची न्यायालयीन सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गद्दार खासदारांना वेळ दिला. या भेटीत त्यांनी गद्दार खासदारांना, 'भिऊ नका, मी पाठीशी आहे' असे सांगितले आहे.

त्यांचे हे वाक्य म्हणजे थेट सर्वोच्च न्यायालयाला दिलेला धमकीवजा संदेश आहे का? त्यांनी न्यायालयाला संदेश दिला, अमित शहांना की देवेंद्र फडणवीस यांना, असा प्रश्न करत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मोदींना लक्ष्य केले.

पंतप्रधान मोदी आणि शिंदे गटाच्या खासदारांमध्ये शुक्रवारी झालेल्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी या गद्दारांना भेटतात. भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी असल्याचा संदेश देतात.

हा संदेश नेमका कोणाला आहे, न्यायालयाला, अमित शहांना की देवेंद्र फडणवीसांना? ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही. पंतप्रधानांनी अशा प्रकारे पाठिंबा देऊन भविष्यातील गद्दारांनाही एक चुकीचा संदेश दिला आहे.

सध्या राजकारणात मतलबी वारे वाहत असून, हा गद्दारीचा व्हायरस आता लोकशाहीचा जीव घेत आहे. गद्दारांना आता कसले भय? माझ्या मनातील शंका आणि भीती मांडण्यासाठी मी आज समोर आल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच, शिवसेनेचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर आता बोलणार नाही. मात्र, संविधानाप्रमाणेच याचा निकाल लागावा, अशी आमची अपेक्षा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, अत्याचार झाले, ज्यामुळे जालियानवाला बाग हत्याकांडाची आठवण आली. तरीही या विद्यार्थ्यांशी कुणीही संवाद साधत नाही. पंतप्रधान मोदी त्यांना भेटत नाहीत, मात्र रात्री इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकतात. आता यांची इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे. कोरोनाकाळात जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो, तेव्हा हेच लोक मला ट्रोल करत होते, याची आठवण ठाकरे यांनी करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT