Uddhav Meets Raj Thackeray :
उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १०) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे संजय राऊत, अनिल परब हे प्रमुख नेते देखील उपस्थित होते. या दोन ठाकरे बंधूंची गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भेट होत आहे. ही भेट राजकीय असलाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दसऱ्या मेळाव्याचं आमंत्रण देखील दिलं असल्याचं सांगितलं जातंय.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यात सातत्यानं भेटी होत आहेत. मराठी भाषेच्या आंदोलनादरम्यान एकत्र आलेले हे दोन ठाकरे बंधू हे सणावाराला सातत्यानं एकमेकांना भेटत होते. यावेळी दोन्ही नेते हे कुटुंबासोबत भेटत असल्यानं ती भेट कौटुंबिक होती असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आज या बैठकीला शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित आहेत. त्यातच मनसेनं आपल्या काही नेत्यांसोबत बैठक बोलवली होती. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होत असल्याची दाट शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्याचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांच्या घरी गेल्याचं सांगण्यात येत आहे. दसरा मेळावा हा शिवसेनाचा राजकीय दिशा ठरवण्यासाठीचा महत्वाचा मेळावा मानला जातो. या मेळाव्याला जर राज ठाकरेंंना आमंत्रण देणं ही एक राजकीय दृष्ट्या शिवसेना आणि मनसेच्या मनोमिलनासाठीचा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी देखील मातोश्रीवर जात एक पाऊल पुढं टाकलं होतं. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यााबाबतची ही मोठी घडामोड म्हणता येईल.