मुंबई : विधानसभा निवडणुकीप्रमाणे महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप बोगस मतदार फिरवतील. त्यामुळे पोलिंग एजंट मतदाराला ओळखणाराच असला पाहिजे. एखाद्या ठिकाणी बोगस मतदार दिसला तर त्याला तेथेच थोबडवा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शाखा व उपशाखा प्रमुखांच्या निर्धार मेळाव्यात दिले. आम्ही सांगूनही निवडणूक आयोग ऐकणार नसेल, वाढीव मतदार यादी दुरुस्त करत नसेल तर आम्ही बोगस मतदार थोपविणार, असेही उद्धव यांनी ठणकावले.
वरळी येथे सोमवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील वाढीव मतदानाबद्दल सादरीकरण केले. उद्धव ठाकरे म्हणाले, ठाकरे ही मराठी हिंदूंची ताकद आहे. निवडणुकीतही ताकद दाखवून द्या. भर पावसात विजयादशमीचा मेळावा घेतला. बोगस मतदार हाच भाजपाचा आधार आहे. मतदारांच्या एका यादीत 1200 नावे आढळली आहेत. यावरून 4 ते 5 जणांचे एक कुटुंब झाले तर 300 घरे कंट्रोल करता का? त्यामुळे यादीनुसार ती व्यक्ती त्या घरात राहते की नाही याची खात्री करून घ्या. चेहऱ्यानिशी ते मतदार आहेत की नाही, तेही तपासले पाहिजे, असा सल्ला उद्धव यांनी निवडणूक यंत्रणेला दिला.
वरळी विधानसभा मतदार संघातील वाढीव मतदानाबाबत आदित्य ठाकरे यांनी जे दाखवले ते फक्त एक उदाहरण आहे. हेे काम आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात करायचे आहे. सर्वच विरोधी पक्ष व्हीव्हीपॅटची मागणी करत आहेत. पण भाजपाचे ऐकून निवडणूक आयोग आमची मागणी पूर्ण करणार नाही. आमच्यावर गुन्हा नोंदविणार असाल तर निवडणूक आयुक्त यांच्यावरही कारवाई करा. अन्यथा आमचे सरकार आल्यावर निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
हिम्मत असेल तर उघडपणे मैदानात या
शिवसेनाप्रमुखांची किमया अजून संपलेली नाही. शिवसेनेने पाठिंबा दिला म्हणूनच चहावाला पंतप्रधान झाला. पण त्यानेच चहावर जीएसटी लावला. भाजप हा कसला सर्वात मोठा पक्ष? ही देशप्रेमाची बोगस टोळी आहे. आत्मनिर्भर घोषणा देणाऱ्या भाजपाला इतर पक्षांचे नेते फोडावे लागत आहेत. लोकांचा पाठिंबा मिळत नाही. हिम्मत असेल तर उघडपणे मैदानात या. बाराशे मतदारांची यादी हाच माझा वॉर्ड हे ठरवून काम करा. तुम्ही सोबत आहात म्हणून भाजपाला आव्हान देत आहे. निवडणुकीत विजय आमचाच आहे, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त करत शाखाप्रमुखांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याची आदेश दिले.
1 लाख 27 हजार कोटींचा जीएसटी लुटला
मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर आमच्यावर टीका करण्यात आली. या दीपोत्सवामध्ये मराठी आणि अमराठीही होते. हिंदुत्व सोडले अशी शिवसेनेवर टीका करता, पण गोवंश बंदीला आम्हीच पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने 1 लाख 27 हजार कोटींचा जीएसटी लुटला. तोपर्यंत कोणीही बोलले नाही. पण थोडा जीएसटी कमी करताच त्यांनी महोत्सव साजरा केला, त्याचे काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
विरोधकांवर घराणेशाहीचा आरोप करणारे केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांचा मुलगा क्रिकेट बोर्डात आहे. अमित शहा हे ॲनाकोंडा असून त्यांना मुंबई गिळायची आहे. पण तुम्ही मुंबईत पुन्हा याल, तेव्हा शिवसेनेच्या भगव्याने मुंबई भगवी झालेली दिसेल, असे आव्हानही उद्धव यांनी शहा यांना दिले.
एलआयसीचे कोट्यवधी रुपये उद्योगपतीच्या घशात
स्वतः पैसे खर्च करून पक्ष कार्यालय उभे करता तर मराठी रंगभूमीचे दालन अजून का उभे करत नाही? नवीन कार्यालय करता तर गडकरी यांनाही बोलवा, असा चिमटाही उद्धव यांनी काढला. अदानीसारख्या उद्योगपतीच्या घशात एलआयसीचे कोट्यवधी रुपये घालत आहेत. विरोधकांनी कोंडी केल्यानंतर एलआयसीचे सर्व नियम तपासून अदानी समूहाला कर्ज दिले असल्याचा खुलासा करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. आता वरळीत आणखी एक बीकेसी करणार आहेत. कारण तेथील जागाही अदानीला द्यायची आहे, असा आरोप उद्धव यांनी केला.