मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारांनी रंगत आणली असतानाच रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत 3 लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप करीत भाजप आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. सत्ताधाऱ्यांनी पालिकेच्या कंत्राटदारांना 3 लाख कोटी ॲडव्हान्स मोबिलायझेशनमधून दिले आणि त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा निवडणुकीसाठी वापरणार असल्याचा गौप्यस्फोटही केला. हा 3 लाख कोटींचा घोटाळा खोकासुरांनी केल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिवसेना भवन येथे रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त वचननाम्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अधिकृतपणे प्रकाशन करण्यात आले. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद झाली. महायुतीच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या ठेवी या काय चाटायला नसतात, या विधानाचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, फडणवीस यांचे हे विधान अशोभनीय आहे. त्यांचे हे म्हणणे खरे असले, तरी या ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायलाही नसतात. त्यांनी पूर्णपणे विल्हेवाट लावल्याचा आरोपही त्यांनी केला.
बिनविरोध निवडणुका रद्द करा!
देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली, ठाण्यासह बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची सुरू झालेली प्रक्रिया ही जनतेचा आणि लोकशाहीचा अवमान करणारी आहे. जिथे जिथे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तेथे नव्याने निवडणूक घ्या, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट आरोप करत उद्धव ठाकरे यांनी, निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी केली.