मुंबई : राज्यसभा सचिवालयाने संसदेत ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ म्हणण्यावर बंदी घालण्याची अधिसूचना काढल्याने ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. ही कृती कोणत्या डोक्याची आहे, असा संतप्त सवाल करत शिवसेनेचे खासदार संसदेत ‘वंदे मातरम्’ म्हणणारच. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निलंबित करून दाखवावे, असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि भाजपवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, कधीकाळी हाच भाजप या देशात राहायचे असेल तर वंदे मातरम् बोलावेच लागेल, असा म्हणणारा पक्ष होता. पण राज्यसभेच्या सचिवालयाने काढलेल्या या पत्रकामुळे भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. आज तेच वंदे मातरम् म्हणू नका सांगत आहेत. हा ढोंगीपणा असून ते ना हिंदू आहेत, ना देशप्रेमी आहेत, अशी टीका केली.
लोकसभा व राज्यसभेतील शिवसेनेचे (ठाकरे) खासदार वंदे मातरम्, जय हिंद बोलणारच, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजपचे हिंदुत्व ढोंगी आहे. त्यांच्या तोंडात राम व बगलमे अदानी आहेत, अशी टीका उद्घव ठाकरे यांनी केली.