ठाकरे वगळून उर्वरित आघाडी सोबत घेऊन काँग्रेस लढणार (File Photo)
मुंबई

BMC Election : ठाकरे वगळून उर्वरित आघाडी सोबत घेऊन काँग्रेस लढणार

मनसेसोबत होऊ घातलेल्या युतीची पूर्वकल्पना उद्धव ठाकरे यांनी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नरेश कदम

शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात युतीबाबत बोलणी सुरू झाली. या युतीत सामील व्हायचे की वेगळे लढायचे अशा पेचात काँग्रेस पडली असून, उद्धव ठाकरे गटाला वगळून उर्वरित महाविकास आघाडी सोबत घेऊन लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.

ठाकरे बंधू एकत्र येत असून त्यांच्यात युतीबाबतच्या बोलणीला बुधवारपासून सुरुवात झाली. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीचे काय होणार ? उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडणार का? ठाकरे बंधूच्या युतीत काँग्रेस सामील होणार का, की काँग्रेस वेगळी लढणार, असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस या ठाकरे बंधूंच्या युतीत सामील होणार नाही. महाविकास आघाडीतील उर्वरित पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा विचार करत आहे.

ठाकरे बंधूंची युती ही मुंबई, ठाण्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसारख्या महापालिकांमध्ये मराठी मते घेईल. मराठी माणसांची मुंबई हा ठाकरे बंधूंचा प्रमुख मुद्दा असेल. त्यामुळे काँग्रेसला या युतीत सामील करुन घेणे ठाकरे बंधूना परवडणारे नाही. तसेच ते काँग्रेसलाही परवडणारे नाही.

मुस्लिम, दलित आणि उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसचा जनाधार असल्याचे त्यांचे नेते मानतात. त्यामुळे मनसेसोबत गेल्यास हा मतदार नाराज होईल, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. मनसेला सोबत घेतले तर जागावाटपाचाही पेच निर्माण होऊ शकतो. 2014 पासून भाजपकडे वळलेल्या उत्तर भारतीय मतदाराला चुचकारण्याचा प्रयत्न म्हणून ठाकरे बंधूंसोबत जाणे टाळण्याचा विचार काँग्रेस करत आहे.

मनसेसोबत होऊ घातलेल्या युतीची पूर्वकल्पना उद्धव ठाकरे यांनी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात काही जागांवर गुप्त समझोते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात होऊ शकतात. भाजप हेच टार्गेट असल्याने त्यानुसार रणनीतीत तसे बदल केले जातील.

  • मुंबईत मराठी मतांच्या टक्क्यावर 100 चा टप्पा दोघे ठाकरे बंधू गाठतील, असे त्यांचे आडाखे आहेत. काँग्रेस व आघाडीतील मित्रपक्ष 10 जागा जिंकतील असे गणित मांडले जात आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज धरलेला नाही. एकीकृत राष्ट्रवादी मुंबईत साधारणत: 13-14 जागा जिंकत आली आहे. ही संख्या विभागली जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT