Uday Samant On Opt Tiger: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यवर गेले असून त्यांनी यावेळी शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली. तसेच ते खासदारांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला देखील गेले होते. मात्र या भेटीनंतर शिवसेना ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
त्यातच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ऑपरेशन टायगरबाबत सुरू असलेल्या चर्चांवर देखील भाष्य केलं. याचबरोबर त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे हे नाराज असल्याच्या चर्चांवर देखील खुलासा केला.
उदय सामंत म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा खासदारांना भेटण्यासाठी होता. महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदारांनी कशा प्रकारे एनडीएला पूरक भूमिका घ्यावी याचं मार्गदर्शन त्यांनी केलं. अर्थसंकल्पानंतर साहेबांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली. त्यांनी याच भावनेतून ही भेट घेतली आहे.'
उदय सामंत यांना ऑपरेशन टायगरबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी, 'टायगर ऑपरेशनसाठी शिंदे साहेब दिल्लीला गेलेले नाहीत. टायगर ऑपरेशन साहेबांना राबवण्याची गरज नाही. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जे काम केलं. महाराष्ट्र आणि देशात आपलं कर्तुत्व सिद्ध केलं त्यामुळं समोरची लोकं आपोआपच शिंदे साहेबांकडे येतात.'
याचबरोबर उदय सामंत यांनी माजी खासदार राहुल शेवाळेंच्या नाराजीबाबत देखील खुलासा केला. ते म्हणाले, 'राहुल शेवाळे हे शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. ते कुठंही नाराज नाहीत. असा गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही. ते काल माझ्या सोबत होते. आम्हाला संघटनात्मक काही चर्चा करायची होती. ती देखील दिल्ली स्तरावर झाली आहे. वेगवेगळ्या राज्यात जे विस्तारीकरण करायचं आहे त्याबाबत देखील चर्चा झाली. त्यामुळं राहुल शेवाळे नाराज नाहीत.