Ubatha suffers setback in Chandivali constituency
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भाजपा मुंबई अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार तसेच भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईत उबाठा गटाला मोठा धक्का दिला. उबाठा गटाच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईश्वर तायडे आणि आकांक्षा शेट्ये या दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी शेलार आणि दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उबाठा गटाची मुंबईतील परिस्थिती धोकादायक आणि जीर्ण इमारतींसारखी झाली असल्याची टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईकरांच्या मनात ज्यांचे नेतृत्व खोलवर रुजलेले आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आपलेसे केलेय हे या पक्षप्रवेशावरून स्पष्ट होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला मुंबईकरांनी बाजूला सारले असल्याची टीकाही शेलार यांनी केली. आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भाजप मूळ शिवसेना उबाठा यांच्या महापालिकेतील आकड्याला पार करून नंबर एकचा पक्ष झाला असल्याचा दावा शेलार यांनी केला.
शेलार पुढे म्हणाले की, मुंबईकर, मुंबई सणांच्या विरोधी, हिंदुत्वविरोधी आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधी भूमिका घेतल्याने उबाठा सेनेची दयनीय परिस्थिती झाली आहे. त्यांच्या जहाजात आता कोणीच राहू पाहत नाही. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कार्यकर्ते, पदाधिकारी स्वतःहून बाजूला जात आहेत, तीन अंकी नाटकातील आजचा हा पहिला अंक आहे. जे तुमच्या मनात आहे, तो दुसरा अंक काही दिवसांत बघूच आणि तिसरा अंक समारोपाचा असेल. मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस, मुंबईचा वकास आणि देशहित याच्याशी आम्ही एक टक्केही प्रतारणा करणार नाही. देव, देश आणि धर्मासाठी या कार्यपद्धतीवर आम्ही काम करू. मुंबईत सात लाख कोटींच्या विकासकामांना सुरुवात करण्यात आली असून महाविकास आघाडीतील लोकांनी काय केले हे सांगावे किंवा चर्चेला यावे, असे थेट आव्हानच शेलार यांनी दिले.
तत्पूर्वी आमदार दरेकर म्हणाले की, आज भाजपाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन या दोन्ही नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. ईश्वर तायडे हे दलित समाजातून येत असून, त्यांच्याकडे आंबेडकरी विचारांच्या चळवळीचा वारसा आहे. सहकारी, हाऊसिंग क्षेत्रात त्यांचे काम आहे. अशा समाजात वावरणार्या कार्यकर्त्याचा आज भाजपात प्रवेश होत असल्याचा निश्चितच आनंद होतोय. येणार्या काळात जनतेसाठी, गरिबांच्या कल्याणासाठी जे खर्या अर्थाने काम अपेक्षित आहे ते त्यांच्या हातून होईल, अशी अपेक्षा आ. दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.