Shivsena UBT Party Chief Uddhav Thackeray Pudhari
मुंबई

BMC Election 2025: उद्धव ठाकरेंचं मिशन मुंबई; 110 मराठी भाषक वॉर्डांवर भर, 40 जागा मनसेला देणार?

BMC Elections Shiv Sena UBT Strategy: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यूहरचना करण्यास केला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

BMC Elections Shiv Sena Uddhav Thackeray

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘कमॉन, किल मी’ चा नारा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यूहरचना करण्यास प्रारंभ केला आहे. मुंबई महानगरपालिका ही अस्तित्वाची लढाई असेल हे लक्षात घेत पुढची पावले टाकली जात आहेत. सुमारे 110 वॉर्डांत मराठी मतदारांची संख्या निर्णायक असल्याचा शिवसेना उबाठा गटाचा अभ्यास असून या परिसरावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

वरळी, शिवडी, माहिम, लालबाग, परळ, दादर या मुख्य मुंबईतील मराठीबहुल भागाबरोबरच भांडुप, घाटकोपर, जोगेश्वरी, दिंडोशी, बोरिवली या परिसरातील वॉर्डांत 60 टक्क्यांपेक्षा अधिक मराठी मतदार आहेत. या मतदारांवर शिवसेनेची मदार असेल. या परिसरातील प्रत्येक घराशी सेना गेल्या कित्येक वर्षांपासून संबंध राखून आहे. ठाकरे ब्रॅण्डला वाचवण्यासाठी या मतदारांना भावनिक साद घालत विजयाची मोट बांधली जाणार आहे.

शिवसेना उबाठाचे 10 आमदार मुंबईत निवडून आले आहेत. या आमदारांवर प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या शिवाय शिवसेनेचे खासदार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खालपर्यंत पोहोचण्याचे अभियान राबवणार आहेत. मुंबईत माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागात सर्वाधिक आमदार निवडून आले असल्यामुळे त्यांच्यावर या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात त्यांच्या मदतीला काही महत्त्वाचे शिलेदार दिले जातील. आदित्य ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नियोजन कार अनिल देसाई या मोहिमेत विशेषत्वाने लक्ष घालतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज उद्धव ठाकरे यांनी सर्व जागा लढाईची तयारी ठेवा असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात उबाठाच्या अभ्यास गटाने मनसेला 40 जागा घेण्याची तयारी दाखवली आहे. राज ठाकरे हा आकडा मान्य करतील का यापेक्षाही ते समवेत येतील का हाच सध्याचा प्रश्न आहे. मात्र मनसेचा एकही नगरसेवक मुंबई निवडून आलेला नसल्याने 40 ही संख्या त्यांना समाधानकारक असेल असे धरले जाते. शिवसेना उबाठाकडे मुस्लिम मतदार वळले असल्याने यावेळी काँग्रेसने आघाडी केली नाही तरी भविष्यात कामाला येणारी एक वोट बँक तयार होऊ शकते अशी ही शक्यता वर्तवली जाते आहे. अर्थात काँग्रेससोबत आघाडी झाल्यास उत्तर भारतीय मतांची बेगमी होऊ शकेल असाही अंदाज पक्षात व्यक्त केला जातो आहे. मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायची हा सध्याचा मूळ मुद्दा असून त्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील असेही शिवसेनेत या एका महत्त्वाच्या अधिकार्‍याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT