

चिन्ह चोरले, पक्ष फोडला, वडील चोरले तरी उद्धव संपत नाही. पैसा फेको तमाशा देखो असा विरोधकांकडे चोराचा बाजार भरला आहे. जे दाढी खाजवत आहेत ते आधी कुठे होते माहित नाही. आजच्या आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी जमलेल्या शिवसैनिकांचा जयघोष पाहिला तर विरोधकांचे नॅपकिनसह कपडे ओले होतील,’ अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आज साजरा होत असून, ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांनी स्वतंत्र सोहळे आयोजित केले आहेत. ठाकरे गटाचा सोहळा मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये तर शिंदे गटाचा सोहळा वरळीत होणार आहे. दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली असून नेत्यांच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बातम्या सुरु आहेत काय होणार, पण शिवसैनिकांच्या आणि राज्याच्या मनात जे आहे ते मी करणारच, अशा शब्दांत मनसेसोबत युतीचे संकेत देताना मराठी माणसाची शक्ती एकत्र येउ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर आणि नोकराचे नोकर कामाला लागले आहेत. इकडेतिकडे भेटीगाठी घेत आहेत. मुंबई जर मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकाच्या मित्राचे काय होणार ही चिंता यांना सतावत आहे. पण मुंबई आमचीच आहे. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात घेणारच, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड जर पुसून टाकण्याचा प्रयत्न यांनी केला तर भाजपाचे नामोनिशाण या महाराष्ट्रातून मिटवून टाकू, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सुरु पार पडला. वर्धापनदिनासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, सुनील प्रभू तसेच विभागप्रमुख आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी राज्यासह देशातील राजकारणावर ठाकरे शैलीत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजप तसेच शिंदे गटावर निशाणा साधला. मुंंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्रांचे अदानीचे कसे होणार, याची त्यांना चिंता आहे. त्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये, यासाठी शेठजीचे नोकर कामाला लागले आहेत आणि नोकराचे नोकर जे आज वर्धापनदिना साजरा करीत आहेत, असा संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला.
पक्षफोडीच्या राजकारणावर टीका करताना भाजपला पोरे होत नाहीत त्याला आम्ही काय करणार असे ठाकरे म्हणाले. भाजपला स्वत:ची पोरे नाहीत म्हणून त्यांना अशी घ्यावी लागतात. किती पाहिजे तेवढी पोरे घ्या, असे आव्हान त्यांनी दिले. एवढी माणसे चोरली, पक्ष चोरला, वडील चोरले तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. शिवसेनाप्रमुखांनी, शविसैनिकांनी रक्त आटवून शिवसेना नावाचे वादळ निर्माण केले आहे. पैसे फेकून जमवलेली ही माणसे नाही. कट्टर हिंदुत्वनिष्ठ, महाराष्ट्रधर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत, असे सांगत आज दुसरीकडे चोरांचा बाजार सुरु आहे, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लागावला.
मला आणि शिवसेनेला संपवायचा भाजप प्रयत करत आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंनी प्रहार चित्रपटातील डायलॉग ऐकवून भाजपला आव्हान दिले. किल मी... कमॉन किल... तेच मी या गद्दारांना म्हणत आहे कि, अंगावर येताना अमिताभ बच्चन ज्या प्रमाणे अॅम्ब्युलन्स घेउन येतात तशी घेउन या. कारण परत तुम्ही पायावर चालत जाणार नाही, तर स्ट्रेचरवरून आडवे करून पाठवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पण तुम्ही कितीही स्वप्ने बघा शिवसेना संपविण्याची, पण तुमच्या छाताडावर पाय नाही ठेवला नाही तर बघा असा इशाराही ठाकरेंनी दिला.
भाजपचे केंद्रात सरकार आल्यानंतर पनवती लागली आहे. प्रयागराजला, दिल्लीला माणसे चेंगरून मेली. विमान अपघातात लोक मेली, पण जबाबदारी घ्यायला कोणी नाही, असे सांगतानाच आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे, कारण देशाचे सैन्य पाकिस्तानसोबत युद्ध करत असताना ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर यांचा आवाज गेला. त्यामुळे आताचे पंतप्रधान हे फक्त भाजपपूरते आहेत. पहलगाममध्ये अतिरेकी आले कसे? हल्ला झाल्यानंतर ते पाकिस्तानात गेले की पाताळात गेले की भाजपमध्ये गेले. त्यामुळे देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, पक्ष फोडणार्या अमित शहांची नाही. देशाला आणि राज्याला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे. गुंडांना संरक्षण देणार्या राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. भाजपने आता केवळ दाऊदला पक्षात घ्यायचे राहिले आहे. आधी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, चौकश्या लावायच्या, जिणे हराम करायचे आणि नंतर पक्षात प्रवेश द्यायचा. भाजपने आता तुरुंगाबाहेरच सदस्य नोंदणीसाठी टेबल लावले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
हिंदी सक्ती करण्याची गरज काय, असा सवाल करताना हिंदीला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. हिंदी सक्ती करायची तर तामिळनाडू आणि गुजरातमध्ये का करत नाही, असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठीमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम भाजपने केला. लोकांमध्ये भांडण लावून हे भ्रष्टाचार करायला मोकळे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
भाषणाच्या ओघात उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबावरही जोरदार हल्ला चढवला. एक बेडूक आहे त्याला डराव-डराव करण्याचे तितकेच काम दिले आहे. अरे तुझी उंची किती, असा सवाल करत उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. तुझा जीव काय बोलतो काय, तुझी पार्श्र्वभूमी काय, तुझ्या वडिलांची पार्श्र्वभूमी काय आणि आमच्यावर बोलतो. एक कोणी तरी बाप ठरवा आणि मग बोला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता केली.
लाडकी बहिण योजनेला देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. आदिवासींचा निधी तिकडे पळवितात. पण धारावीत अदानीला मुद्रांक माफ, अदानीला सगळे माफ केले आहे. मी 500 फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ केले होता. पण यांनी आता परत लावला. आता कचरा कर लावणार आहेत. देवनार डंपिंग ग्राउंड देखील अदानीला देणार आहेत. अदानी मोकाट सुटलाय. ही लढाई केवळ उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची नाही. 1960 साली ज्या मराठी माणसाने रक्त सांडले त्याची शपथ घेउन जर आपण उभे राहिलो तर मुंबई वाचेल, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.