Tushar Gandhi Mumbai University Pudhari
मुंबई

Tushar Gandhi Mumbai University: तुषार गांधींना मुंबई विद्यापीठात प्रवेश नाकारला; प्रशासनावर टीकेची झोड

भदंत विमांसा यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आले असताना सुरक्षा रक्षकांनी अडवले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी भदंत विमांसा यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी विद्यापीठात आले असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावरच थांबवून विद्यापीठ आवारात येण्यास मनाई केली. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र टीका होत आहे.

मुंबई विद्यापीठात भदंत विमांसा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शैक्षणिक मागण्यांसाठी कलिना संकुलात सत्याग्रह आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी आलेल्या तुषार गांधी यांना अडवणे ही घटना लोकशाही मूल्यांवर आघात करणारी आहे, अशी टिका केली जात आहे.

यापूर्वीही प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन तसेच अमेय आंबेडकर यांना देखील भदंत विमांसा यांची भेट घेण्यासाठी विद्यापीठात येताना प्रशासनाने रोखल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे प्रशासन बाहेरील व्यक्तींना आंदोलनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाने आपली भूमिका मांडताना म्हटले की, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात येणार आहेत, याची कोणतीही पूर्वकल्पना विद्यापीठ प्रशासनास देण्यात आली नव्हती, त्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते कलिना संकुलात येणार आहेत हे विद्यापीठास माहीत असते तर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढे विद्यापीठाचीही बाजू मांडण्यात आली असती.

कलिना संकुलात जवळपास 5 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, वसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थीही वास्तव्यास आहेत. प्राध्यापक त्यांच्या कुटुंबियांसह या संकुलातील सदनिकांमध्ये वास्तव्यास आहेत. कलिना संकुलात बेकायदेशीररित्या बैठ्या स्वरुपातील आंदोलन करणारे राजेश बलखंडे यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सर्व संबंधितांना विचारपूस करून प्रवेश दिला जात आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

विद्यापीठ प्रशासनाने या घटनेबाबत स्पष्ट स्पष्टीकरण द्यावे. शांततामय व कायदेशीर भेटींवरील निर्बंध तत्काळ हटवावे. भदंत विमांसा यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा. विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे आणि समर्थकांचे शांततामय आंदोलन व अभिव्यक्तीचे मूलभूत अधिकार संरक्षित करावे.
वैभव सोनावणे, संघटक, पाली भाषा संवर्धन समन्वय समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT