Turmeric Price Hike Pudhari
मुंबई

Turmeric Price Hike: एपीएमसीत हळदीची आवक ५० टक्क्यांनी घटली

दोन आठवड्यांत किलोमागे १५ रुपयांची वाढ होताना दिसून येते. याचा परिणाम मुंबईच्या घाऊक बाजारावर झाला असून हळदीची आवक ५० ते ६० टक्क्यांनी कमी झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा हळदीचे उत्पादन ५० टक्क्यांहून कमी झाल्याने त्याचा फटका हळद उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी आणि ग्राहकांना बसला आहे. दोन आठवड्यांत किलोमागे १५ रुपयांची वाढ होताना दिसून येते. याचा परिणाम मुंबईच्या घाऊक बाजारावर झाला असून हळदीची आवक ५० ते ६० टक्क्यांनी कमी झाली आहे.

त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी घाऊक बाजारात हळदीचा दर प्रतिक्विंटल १३,५०० रुपये होता, तो आता वाढून १४,३०० रुपयांवर पोहोचला आहे. परिणामी घाऊक बाजारात हळदीचे दर प्रति किलो १३५-१३८ रुपयांवरून १४०-१५० रुपयांवर गेले आहेत. गेल्या वर्षीचा उत्पादन झालेल्या हळदीचा साठा शिल्लक नाही.

जो आहे तो फारच कमी प्रमाणात आहे. त्यात यावर्षी उत्पादनात ५० टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे हळदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय हळद उत्पादनावर परिणाम झाल्याने त्याचा असर आवकवर झाला आहे.

यामुळे हळदीचे दर वाढू लागले आहेत, अशी माहिती एपीएमसीतील हळद व्यापारी अमरीश बारोट यांनी दिली. एपीएमसी घाऊक बाजारपेठेत हळदीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध असताना आता आवकही कमालीची घटली आहे. परिणामी मुंबईच्या घाऊक बाजारात हळदीचे दर कडाडण्यास सुरुवात झाली आहे. किरकोळ बाजारात २०० ते २५० रु किलो असणारी हळद आता ३०० रु किलो झाली आहे.

गेल्या वर्षी हळदीचे उत्पादन सरासरी आले होते. शेतकऱ्यांच्या शेतात जिथे १०० गोणी हळदीचे उत्पादन होत होते, तिथे आता केवळ ५० ते ५५ गोणीच उत्पादन हाती आले आहे. या प्रचंड घटीमुळे बाजारात येणारी हळदीची आवक रोडावली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली असून, वर्षभर ती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. वर्षभरासाठीचा मसाला तयार केला जातो.

यावेळेला अनेक गृहिणी अख्खी हळद विकत घेऊन ती घरी किंवा गिरणीतून कुटून घेतात. त्यानुसार सध्या अख्ख्या हळदीला बाजारात विशेष मागणी आहे. मात्र, ऐन हंगामात झालेल्या या दरवाढीचा मोठा फटका गृहिणींच्या बजेटला बसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT