

मुंबई: मुंबईतील टॅंकरमालकांनी सोमवारपासून पुकारलेला संप मंगळवारी दुपारनंतर मागे घेतला. मात्र दोन दिवस पाणीपुरवठा न झाल्याने मुंबईतील बांधकामांना, पुनर्वसन इमारती व मध्य रेल्वेला याची चांगलीच झळ बसली.
टँकर दोन दिवस न आल्याने निवासी इमारती व पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. सिमेंटचे बांधकाम, क्युरिंग (पाणी देणे) यांसारख्या कामांसाठी महानगरपालिकेचे पाणी वापरण्यास सक्त मनाई असते.
हे प्रकल्प पूर्णपणे खासगी टँकरांवर अवलंबून असतात. संपामुळे या बांधकामांचा वेग मंदावला होता. बांधकामांव्यतिरिक्त हॉटेल्स, रुग्णालये, रेल्वे आणि खासगी कार्यालयांनाही या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जोगेश्वरी पूर्व येथील 'ओबेरॉय स्प्लेंडर' या टॉवरमध्ये संपामुळे टँकर न आल्याने आमचीगैरसोय झाली, असे येथील रहिवासी अनिता पाठक यांनी सांगितले. बांधकामे आणि पुनर्वसन इमारतींना पाणी मिळणे कठीण झाले होते. दरदिवशी मुंबईत मध्य रेल्वेला स्वच्छतेसाठी आणि रेल्वे डब्यात एकूण पाण्याचे १४० टँकर लागतात.
संपामुळे केवळ १२० पाण्याचे टँकर मिळाले. २० टॅंकर पाणी कमी मिळाले. पर्याय म्हणून इगतपुरी, भुसावळ आणि पनवेल या ठिकाणाहून गाड्यांमध्ये पाणी भरले जात असल्याची
माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी दिली. संप सुरूच राहिला तर प्रवासी सुविधांवर ताण येऊ शकतो. प्रसाधानगृहांत पाणी कमी पडू शकते, असे नीला यांनी सांगितले.
मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची माहिती मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे प्रवक्ते अंकुर शर्मा यांनी दिली. त्यांनी वॉटर टँकर मालकांच्या अडचणी समजून घेतल्या.
तसेच केंद्रासोबत या कायद्याच्या अंमलबजावणीत शिथिलता मिळावी म्हणून सकारात्मक चर्चा करू, असा विश्वास दिला. तसेच तहसीलदारांनी टँकर मालकांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्याचे आश्वासन दिल्याचे शर्मा यांनी सांगितले