Mumbai News : अकरावीच्या प्रवेशाची पारदर्शकता धोक्यात Pudhari File Photo
मुंबई

Mumbai News : अकरावीच्या प्रवेशाची पारदर्शकता धोक्यात

वेळापत्रकांत वारंवार बदल; पहिली गुणवत्ता यादी 16 दिवस पुढे ढकलली

पुढारी वृत्तसेवा

Transparency of 11th class admissions in jeopardy

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दहावीचा निकाल यंदा वेळेवर जाहीर करत राज्य मंडळाने सुरुवात चांगली केली, पण त्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील कारभार पूर्णपणे नियोजनशून्य आणि गोंधळाचा ठरला आहे. अपूर्ण माहिती, यादीसह वेळापत्रकात बदल, तसेच तारखांबाबतच्या संभ्रमामुळे लाखो विद्यार्थी भांबावले आहेत. शालेय शिक्षण विभागाचा अकार्यक्षम कारभार आणि वेळेचे भान न ठेवता घेतले जाणारे निर्णयामुळे प्रवेशाची पारदर्शकताच धोक्यात आली आहे.

राज्यातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत वेळापत्रकांमधील सतत बदलांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. रविवारी, 8 जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या शून्य फेरीच्या गुणवत्ता यादीचे वेळापत्रक आणि त्यानंतर सुरू होणार्‍या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी काढलेल्या सुरुवातीच्या निर्णयानंतर आत्तापर्यंत वेळापत्रकात तीन वेळा बदल करण्यात आले आहेत. त्यात इनहाऊस आणि अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशाच्या तारखांमध्येही दोनवेळा फेरफार करण्यात आला आहे. शून्य फेरीची गुणवत्ता यादी 11 जून रोजी जाहीर होणार असून, 12 ते 14 जून दरम्यान त्यानुसार प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात 10 जूनला पहिली गुणवत्ता यादी (कॅप राऊंड) प्रसिद्ध होणार होती. मात्र, आता सुधारित वेळापत्रकानुसार तब्बल 16 दिवसांनी म्हणजेच 26 जूनला होणार आहे.

17 जून रोजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाळा आणि प्रवेश प्रक्रियेचे परीक्षण करण्यात येणार असल्याचे वेळापत्रकात नमूद आहे. मात्र, या अगोदर इतका कालावधी कशासाठी? हा मोठा प्रश्न पालकांपुढे उभा आहे. पहिल्या यादीनंतर 27 जून ते 3 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कॅप राऊंड अंतर्गत प्रवेश घ्यायचा असून, दुसर्‍या फेरीसाठी 5 जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे सर्व जून हा पहिल्या यादीलाच जाणार आहे. एका यादीमागोमाग दुसरी यादी आणि त्यानंतर वेळापत्रकात फेरफार यामुळे विद्यार्थ्यांना योग्य महाविद्यालय मिळेल का? याबाबतही चिंता निर्माण झाली आहे.

5 जून या अर्ज नोंदणी करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली. यातील 12 लाख 15 हजार 190 विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क ऑनलाईन जमा केले. त्यातील 12 लाख 5 हजार 162 विद्यार्थ्यानी अर्जाचा पहिला भाग भरला. तर 11 लाख 29 हजार 924 विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून अर्ज निश्चित (लॉक) केला आहे. भाग 1 भरलेला परंतु भाग 2 भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 75 हजार इतकी होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांची नियमित फेरीची संधी वाया जाऊ नये यासाठी शिक्षण संचालनालयाने 6 जून रोजी 12.15 वाजता ते 7 जून रोजी 12.30 वाजता या कालावधीत अर्जाचा भाग दोन भरण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. मात्र या 24 तासांच्या कालावधीमध्ये अवघ्या नऊ हजार विद्यार्थ्यांनीच भाग दोन भरला. त्यामुळे भाग दोन भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 11 लाख 38 हजार इतकी झाली आहे. अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचा पहिल्या नियमित फेरीसाठी विचार करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्ज निश्चित केलेल्या 11 लाख 38 हजार विद्यार्थी नियमित फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

वेळापत्रकात झालेला बदल

प्रवेश प्रक्रिया जुने वेळापत्रक नवे वेळापत्रक बदल

अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप 8 जून 11 जून 3 दिवस उशीर

शून्य फेरीतील प्रवेश प्रक्रिया 9 ते 11 जून 12 ते 14 जून 3 दिवस उशीर

कॅप फेरी-1 चे वाटप तयार करणे 9 जून 17 जून 8 दिवस उशीर

कॅप फेरी-1 जाहीर करणे- 10 जून 26 जून 16 दिवस उशीर

कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 11 ते 18 जून 27 जून ते 3 जुलै पूर्णपणे पुढे ढकलले

फेरी-2 साठी रिक्त जागांची यादी 20 जून 5 जुलै 15 दिवस उशीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT