Torres Ponzi Scheme
मुंबई : कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवत टोरेस कंपनीच्या माध्यमातून १५ हजार गुंतवणूकदारांची तब्बल १५० कोटींची फसवणूक करणाऱ्या युक्रेनियन टोळीच्या प्रमुख सदस्यांपैकी एकाचा युक्रेनमध्ये शोध लागला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या विदेशी आरोपीला भारतात परत आणण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिली.
टोरेस गुंतवणूक घोटाळ्यात असलेल्या नऊ परदेशी नागरिकांपैकी लुरचेंको इगोर हा एक आहे. हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच सर्वांनी देशातून पळ काढला होता. आरोपी इगोर हा टोरेस घोटाळ्यात सक्रियपणे सहभागी होता. दादरमधील मुख्य शाखेसह अनेक ठिकाणी तो सतत येत-जात असे. ६ डिसेंबर २०२४ रोजी तो भारतातून पळून गेला होता.
आर्थिक गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून इगोर विरोधात 'ब्लू कॉर्नर नोटीस' (BCN) जारी केली होती. यानंतर युक्रेनमधील तपास यंत्रणांनी मे महिन्यात त्याचा शोध लावला आणि त्याच्यावर पाळत ठेवली. "युक्रेनियन अधिकाऱ्यांकडून माहिती मिळताच आम्ही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. इंटरपोलमार्फत युक्रेनला अधिकृत अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे त्यांच्या अधिकृत भाषेत पाठवली जातील. युक्रेनकडून मान्यता मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचे एक पथक त्याला भारतात आणण्यासाठी रवाना होईल," असे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
इगोर याच्यासह युक्रेनचे नागरिक असलेले विक्टोरिया कोव्हालेन्को, अलेक्झांडर बोराविक, अलेक्झांडर झॅपिचेंको, ओलेक्सांड्रा ब्रुंकिन्स्का, ओलेक्सांड्रा ट्रेडोखिब, आर्टेम ऑलिफर्चुक यांच्यावर तसेच तुर्कीचा मुस्तफा कराकोक यांच्यावरही ब्ल्यू कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, इगोर भारतात आणल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर अधिक पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
२०२४ मध्ये Platinum Hern Pvt Ltd या कंपनीमार्फत चालवण्यात आलेल्या टोरेस पोंझी स्कीममध्ये मुंबई आणि शेजारील जिल्ह्यांतील सुमारे १५ हजार गुंतवणूकदारांची १५० कोटींची फसवणूक झाली. मार्च २०२५ मध्ये EOW ने २७ हजार १३४ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर आर्थिक गुन्हे तपास संस्थे (ED) ने मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू करून स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले. ED च्या चौकशीत निष्पन्न झाले की, दादर येथे टोरेस (प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीची मुख्य शाखा असून या कंपनीच्या इतर शहरातही अनेक शाखा आहेत. कंपनीने सुरुवातीला मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केल्यास दर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले. मग विविध आकर्षक योजना आणल्या व गुंतणुकदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे गुंतवणुकदार, त्यांच्या परिचित व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रमंडळी असे सारेच टोरेसमध्ये गुंतवणुक करून बसले.
६ जानेवारी रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा रोड येथील हजारो गुंतवणूकदारांनी दादर, मीरा रोड आणि एपीएमसी नवी मुंबई येथील टोरेसच्या ज्वेलरी स्टोअर्सबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी या प्रकरणी स्वतंत्र एफआयआर नोंदवले, शिवाजी पार्क पोलिसांनी मुख्य एफआयआर दाखल केला. नंतर, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार, एक विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले. या प्रकरणात आठ युक्रेनियन नागरिक आणि एका तुर्की नागरिकासह एकूण ११ आरोपी फरार आहेत.