

मुंबई : कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक करणाऱ्या दादरच्या टोरेस कंपनीच्या तीन संचालकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. छोट्या छोट्या गुंतवणूकदारांना या कंपनीने १३ कोटी ४८ लाखांना गंडवले असावे असा प्राथमिक अंदाज असला तरी या छोट्या गुंतवणूकदारांत टोरेसकडे तब्बल चार कोटी रुपये गुंतवणारा दादरचाच एक भाजीविक्रेता निघाला आणि दादरच्या भाजी मार्केटचेही डोळे विस्फारले. सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कार्टर, यांच्यासह आणखी आठ आरोपी फरार आहेत.
दादर येथे टोरेस (प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीची मुख्य शाखा असून या कंपनीच्या इतर शहरातही अनेक शाखा आहेत. कंपनीने सुरुवातीला मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केल्यास दर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले. मग विविध आकर्षक योजना आणल्या व गुंतणुकदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे गुंतवणुकदार, त्यांच्या परिचित व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रमंडळी असे सारेच टोरेसमध्ये गुंतवणुक करून बसले. गेल्या वर्षभरात दादरच्याच शाखेत जवळपास एक लाखाहून अधिक गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली. हाच आकडा १३ कोटी ४८ लाख रुपये इतका आहे. सुरुवातीला मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिल्यानंतर कंपनीने काही दिवसांपासून पैसे देणे बंद केले आणि मग या गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले अनेक गुंतणुकदारांनी कंपनीच्या विविध शाखांमध्ये गर्दी केली असता कंपनीचे संचालक व पदाधिकारी पसार झाल्याचे स्पष्ट झाले. आणि मग हे प्रकरण प्रदीपकुमार वैश्य (वय ३१ वर्षे) या भाजीवाल्याच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी हाती घेतले. गुन्हा दाखल होताच विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेले तिघे आरोपी वेगवेगळ्या भागांत हाती लागले.
भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याचे आश्वासन गुंतवणूकदारांना टोरेस कंपनीतर्फे देण्यात आले होते. गेल्या महिन्यापर्यंत अनेकांच्या पैशाची परतफेड देखील करण्यात आली. भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी टोरेस कंपनीने हिरा देखील दिला. मात्र तो खोटा असून त्याची बाजारभाव किंमत फक्त ५०० रुपये निघाली.
तानिया ही उझबेकिस्तान तर व्हेलेंटिना ही रशियाची रहिवासी आहे. व्हेलेंटिनाने एका भारतीय नागरिकाशी लग्न केले आहे. अजय सुर्वे कंपनीचा संचालक असून त्यानेच इतरांच्या मदतीने ही फसवणूक योजना सुरु केली. एफआयआरमध्ये ही फसवणूक तेरा कोटीची असली तरी हा आकडा त्यापेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. टोरेस कंपनीत काही लोकांनी १० लाख तसेच जास्तीत जास्त ५० लाखपर्यंत गुंतवले असून आता ते सारेच हवालदिल झाले आहेत. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दादर, नवी मुंबई, कल्याण येथीले दुकान बंद झाली असून या बंद दुकानांसमोर हताश झालेले गुंतवणूकदार रोज गर्दी करू लागले आहेत.
प्रदीपकुमार वैश्य (वय ३१ वर्षे) नावाच्या एका भाजी विक्रेत्याने या कंपनीत तब्बल ४ कोटी रुपये गुंतवले. त्याच्या या गुंतवणुकीचा आकडा पाहून दादर भाजी मार्केटच्या भुवया उंचावल्या आहेत. दादरच्या टोरेस शोरूमसमोरच त्याचे भाजीपाल्याचे दुकान आहे. शोरुमसमोर होणारी गुंतवणूकदारांची गर्दी पाहून तो देखील भुलला आणि त्याने ही प्रचंड रक्कम गुंतवली. या भाजी विक्रेत्याने एवढा पैसा कुठून आणला? की त्याच्या नावावर कुणा बड्या आसामीने हा पैसा गुंतवला याचे उत्तर मात्र त्यानेच केलेल्या तक्रारीत तो देतो. प्रदीपकुमार वैश्य यांनी सुरूवातीलाच ६ लाख ७० हजार रूपये गुंतवले. त्यानंतर दोन-तीन महिने वेळेत परतावा मिळत गेला. कंपनीने परतावा देण्याची टक्केवारी वाढवल्याने पत्नी, कुटुंबीय, मित्र परिवारासह अनेकांकडून पैसे घेतले, घर गहाण ठेवून रक्कम गोळा केली आणि एकूण ४ कोटी २७ हजार रुपयांची गुंतवणूक केल्याचे वैश्य यांनीच पोलीस तक्रारीत म्हटले आहे.