मुंबई: टोरेस ज्वेलर्सच्या कथित पोंझी गुंतवणूक योजनेशी संबंधित १७७.११ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणातील फरार आरोपी सागर मेहता याला दुबईत अटक करण्यात आली. भारतीय तपास यंत्रणेच्या विनंतीवरून जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे दुबईच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
मेहता २०२४च्या डिसेंबरपासून फरार होता. त्याच्या अटकेची माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाला दिली.
टोरेस ज्वेलर्सचे संचालन करणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड (PHPL) कंपनीने गुंतवणूकदारांना सोने, चांदी, हिरे आणि मौल्यवान रत्नांमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या परताव्याचे आमिष दाखविल्याचा ईडीचा आरोप आहे.
आठवड्याला दोन ते नऊ टक्क्यांपर्यंत परतावा आणि नवीन गुंतवणूकदार जोडल्यास २० टक्के बोनस देण्याचे आश्वासन देण्यात येत होते. शोरूममध्ये सेमिनार, जाहिराती आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
मोइसॅनाइटला हिऱ्याचे स्वरूप
तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, कमी किमतीच्या सिंथेटिक मोइसॅनाइट दगडांना मौल्यवान हिरे किंवा रत्नांच्या स्वरूपात सादर करण्यात आले. त्यांची भविष्यातील किंमत वाढेल, असे सांगून ग्राहकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम वैध व्यावसायिक व्यवहाराऐवजी इतर मार्गाने वळवण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे.
हवाला, क्रिप्टोमार्गे पैशांचा व्यवहार
ईडीच्या तपासानुसार, गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रोकड हवाला ऑपरेटरमार्फत वळवून पुढे यूएसडीटी (USDT) क्रिप्टोकरन्सीत रूपांतरित करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम पुन्हा वैध गुंतवणुकीच्या स्वरूपात दाखविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. ईडीने आतापर्यंत मनी लाँडरिंगच्या तपासात १७७.११ कोटी रुपयांची गुन्ह्यातून मिळालेली रक्कम (प्रोसीड्स ऑफ क्राइम) निश्चित केल्याचे न्यायालयाला सांगितले आहे.
सागर मेहताची भूमिका काय?
ईडीच्या म्हणण्यानुसार, गुन्ह्यातून मिळालेली रक्कम गोळा करणे आणि तिच्या हस्तांतरणात मेहताची भूमिका होती. तपास सुरू झाल्यानंतर त्याने भारत सोडला. त्याच्याविरोधात यापूर्वी अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. आता दुबईतील अटकेनंतर त्याला भारतात आणण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
तीन परदेशी आरोपींचाही शोध
या प्रकरणात मेहतासह ओलेना स्टोइयन, ओलेक्झांडर झापिचेंको आणि व्हिक्टोरिया कोवालेन्को या तीन युक्रेनियन नागरिकांविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, झापिचेंको आणि स्टोइयन यांनी कथित आर्थिक रचना आणि मनी लॉन्ड्रिंगची यंत्रणा उभारण्यात भूमिका बजावली.
अटकेनंतर तपासाला नवी दिशा
मेहताच्या अटकेमुळे १७७ कोटी रुपयांच्या रकमेच्या प्रवाहाचा तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम कोणत्या खात्यांत वळवण्यात आली, हवाला आणि क्रिप्टो व्यवहारात आणखी कोण सहभागी होते तसेच परदेशात पैसा कुठे पोहोचला, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. मेहताकडून मिळणाऱ्या माहितीतून या प्रकरणातील अन्य फरार आरोपी आणि आर्थिक नेटवर्कपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ईडीकडून केला जाणार आहे.
मुंबई परिसरात सहा शाखांचा विस्तार
टोरेस ज्वेलर्सने मुंबई आणि लगतच्या परिसरात सहा ठिकाणी शोरूमचा विस्तार केला होता. २०२५मध्ये गुंतवणूकदारांचा आक्रोश सुरू झाल्यानंतर या शाखा बंद झाल्या.