पनवेल: दगड खाणी व्यवसायाशी संबंधित कर आणि रॉयल्टीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल एक कोटी ५० लाख रुपयांची लाच मागून ४० लाख रुपयांचा सौदा निश्चित करणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासगी मध्यस्थाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बेड्या ठोकल्या आहेत.
तक्रारदाराकडून ४० लाख रुपयांची लाच स्वीकारताना खासगी मध्यस्थाला रंगेहाथ पकडल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचे सूत्र थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नेले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती, अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि खासगी मध्यस्थ नरेंद्र राजपूत या तिघांना अटक करण्यात आली.
सीबीआयने या प्रकरणात २६ ऑगस्ट रोजी केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागातील अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदाराच्या दगड उत्खनन व्यवसायाशी संबंधित कर आणि रॉयल्टीचे प्रकरण त्याच्या बाजूने निकाली काढण्यासाठी तब्बल एक कोटी ५० लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.
मात्र, चर्चेनंतर लाचेची रक्कम ४० लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत सीबीआयने सापळा रचला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार खासगी मध्यस्थ नरेंद्र राजपूत याने तक्रारदाराकडून ४० लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारली.
त्याच वेळी दबा धरून बसलेल्या सीबीआयच्या पथकाने राजपूत याला रंगेहाथ पकडले. मध्यस्थाच्या चौकशीतून या कथित लाचखोरीच्या व्यवहाराचे धागेदोरे केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले. त्यानंतर सीबीआयने विनय कुमार कांठेती, अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ आणि राकेश कुमार सिन्हा, अधीक्षक, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग, रायगड यांना अटक केली.
४३ लाखांची रोकड; ९० लाखांचे दागिने
तिघांना अटक केल्यानंतर सीबीआयने त्यांच्या निवासस्थानांसह संबंधित ठिकाणी झडतीसत्र सुरू केले. या कारवाईदरम्यान सीबीआयच्या हाती मोठी रोकड आणि दागिने लागले. झडतीत ४३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून, सुमारे ९० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. या रोकड आणि दागिन्यांचा या लाचखोरीच्या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, आरोपींकडे ही मालमत्ता कुठून आली, तसेच कथित लाचखोरीच्या व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे.