भाजपने शिवसेना पक्ष फोडला. मात्र त्यांना चारच जागा अधिक मिळाल्या. मिळाले. बहुमत हे चंचल असते. एवढे सोपे असते तर महायुतीमधील नगरसेवक असे कोंडून ठेवले नसते.
Sanjay Raut on Mumbai Mayor Election
"मुंबईचा महापौर शिवसेना ठाकरे बंधूंचा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा झाल्या आहेत. मी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पडद्यामागे अनेक हालचाली होत आहेत, असे स्पष्ट करत मी आणि काही नेते हे आज ताज लँड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. मला कालच जायचं होत, पण समजलं इथे तर कोंडवाडा झाला आहे. मात्र आमच्यावर संशय घेऊ नका," असे सूचक विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१८) माध्यमांशी बोलताना केले.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे सोडले तर कोणालाच वाटणार नाही मुंबईचा महापौर भाजपचा व्हावा. एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत, हा त्यांचा प्रश्न आहे. ते अमित शहा यांच्याकडे जाऊन बोलतील. मात्र देवेंद्र फडणवीस ऐकतील असे वाटत नाही. एकनाथ शिंदे यांना नगरसेवक फुटण्याची भीती वाटते. शिंदे गटाच्या नगरसेवकांना येथे का ठेवले, सुरतला घेऊन जायचे ना, असा खोचक सवालही त्यांनी केला.
नगरसेवकांचे अपहरण केले जाईल, अशी भीती देवेंद्र फडणवीसांना आहे. त्यांना किती काळ कोंडून ठेवणार? हे नगरसेवक शिवसेनेचे आहेत. भारतीय जनता पार्टीचा महापौर होऊ द्यायचा नाही. आजही शिंदेंच्या सोबत गेलेत, त्यांच्या मनात धगधग आहे. नवीन चेहरे आहेत, मूळ शिवसैनिक असतो, त्यांची भावना असते. आमच्या लक्षात असे आले आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर होऊ द्यायचा नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
भाजपने शिवसेना पक्ष फोडला. मात्र त्यांना चारच जागा अधिक मिळाल्या. बहुमत हे चंचल असते. हे सर्वजण मोदींच्या करंगळीवर चालतात. एवढे सोपे असते तर महायुतीमधील नगरसेवक असे कोंडून ठेवले नसते. दावोसला जातात, मात्र गुंतवणूक कधी येत नाही. तिथे बसून ते इथलेच राजकारण करतात, असा टोला लगावत अमित शहा यांचा महापौर फडणवीस होऊ देणार का, नगरसेवक स्वतःच्या राज्यात लपून ठेवावे लागतात तर कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे ते दाखवून देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
आम्ही सर्वांनी प्रयत्न केले जास्त नगरसेवक निवडून यावे. राज ठाकरे यांना दुर्दैवाने कमी जागा मिळाल्या. शिवसेनेचे निवडून आलेले आणि मनसेचे निवडून आलेले हे राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांचेच आहेत. ठाकरे बंधू अशी युती आहे, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या त्याचे अभिनंदन आहे. तेही नगरसेवक आमचेच आहेत. मात्र काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे भाजपचा फायदा झाला, असेही ते म्हणाले.