मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद केल्याने दादरच्या टिळक उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने जी. उत्तर विभाग कार्यालयासमोरील येलवे मार्ग थेट सेनापती बापट मार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवाजी मंदिर आणि वीर कोतवाल उद्यान येथे होणारी वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे.
दादर पश्चिम येथील एन. सी. केळकर मार्गाला जोडून जे. के. सावंत मार्ग जात आहे. हा मार्ग पुढे मनमाला टँक रोड रस्त्याला जोडला जावून यापुढे माटुंगा रोड पश्चिम येथील पुलाजवळ जोडला आहे. तसेच जे. के. सावंत मार्गावर जी. उत्तर विभागासमोरुन हरिश्चंद्र येलवे मार्ग जातो.
हा येलवे मार्ग पुढे जावून खंडित होत असून या रस्त्याचा पुढील मार्ग मोकळा केल्यास तो सेनापती बापट मार्गाला जावून मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाने निर्णय घेत जमीन संपादित करून येवले मार्ग सेनापती बापट मार्गाला जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अशी सुटणार समस्या
रस्ता रुंदीकरणासाठीचा अडथळा दूर करून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृहासमोरील जे. के.सावंत मार्गाला जोडणारा हरिश्चंद्र येलवे मार्ग थेट सेनापती बापट मार्गाला जोडला जाणार आहे. तर हरिश्चंद्र येलवे मार्ग हा जे. के. सावंत मार्गापासून सेनापती बापट मार्गाला जोडल्यास न.चि. केळकर मार्गावरील कोतवाल उद्यान व टिळक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व प्रक्रिया पूर्ण
हा रस्ता जे. के. सावंत मार्गाच्या ठिकाण 40 फूट रुंदीचा आणि पुढे 50 फूट रुंदीचा तर सेनापती बापट मार्गाला जोडण्याच्या ठिकाण 6.10 मीटर अर्थात 20 मीटर रुंदीचा असेल, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. या रस्त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आता जमीन हस्तांतरीत करण्यात येणार आहे.