मुंबई :अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील वाहनावर झालेल्या गोळीबार प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. याप्रकरणात एकूण १३ आरोपींना अटक झाली आहे. त्यातील एका आरोपीचे वय घटनेच्या दिवशी १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे न्यायालयीन चौकशीत स्पष्ट झाले आहे.
विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नवंदर यांनी बाल न्याय कायद्याच्या कलम ९ अंतर्गत केलेल्या चौकशीचा आधार घेत आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याचे निर्देश दिले. तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने आरोपीला तपास अधिकाऱ्याच्या ताब्यात द्यावे आणि त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.यापूर्वी पोलिसांनी आरोपीचे वय १९ वर्षे असल्याचे नमूद केले होते.
आरोपीच्या वडिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा दावा करीत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर विशेष न्यायालयाने मुंबई पोलिसांना त्याच्या वयाची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांचे पथक हरियाणात गेले होते. तेथील शाळेचे दाखले, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक परीक्षेचे प्रमाणपत्र, प्रवेश नोंदवही आणि जन्मदाखला अशा कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
तपासात आरोपीची जन्मतारीख ३० नोव्हेंबर २००८ असल्याचे निष्पन्न झाले. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी टायगर श्रॉफच्या वाहनावर गोळीबार झाला, तेव्हा त्याचे वय १७ वर्षे १० महिने आणि १८ दिवस होते. त्यामुळे तो घटनेच्या दिवशी कायद्यानुसार अल्पवयीन असल्याचे न्यायालयाने मान्य केले.
१६ ते १८ वयोगटातील मुलाने गंभीर किंवा जघन्य स्वरूपाचा गुन्हा केल्यास बाल न्याय मंडळाला त्याची मानसिक व शारीरिक क्षमता, गुन्ह्याचे परिणाम समजण्याची क्षमता आणि गुन्हा घडविण्याची परिस्थिती यांचे प्राथमिक मूल्यांकन करता येते. त्यानंतर कायद्यातील तरतुदींनुसार प्रौढ व्यक्तीप्रमाणे खटला चालविण्याबाबत निर्णय होऊ शकतो.