Tiger Shroff  Pudhari
मुंबई

Tiger Shroff Juhu Firing Case:टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात बारावा आरोपी अटकेत; २५ ते ३० बँक खात्यांचे जाळे संशयाच्या भोवऱ्यात

अनिल पंडितच्या खात्यांची पाळेमुळे शोधणार; आर्थिक सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील कारवर झालेल्या गोळीबारामागील आर्थिक जाळ्याचा मुंबई गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी खरेदी, शस्त्रांची व्यवस्था, आरोपींचा प्रवास आणि अन्य खर्चांसाठी पैसे कुठून आले, याचा शोध घेताना पोलिसांना संशयास्पद बँक व्यवहारांची मालिका आढळली आहे.

कथित सूत्रधार अनिल पंडित याने तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी २५ ते ३० बँक खात्यांचे जाळे वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ऑनलाइन पेमेंट आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून छोट्या-छोट्या रकमांचे व्यवहार केल्याचेही तपासात समोर आले आहे. यामुळे आर्थिक सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

अमर मुंडिया बारावा आरोपी

या आर्थिक व्यवहारांच्या तपासातून हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा येथील अमर सुरेंद्र मुंडिया उर्फ अमन याचे नाव पुढे आले. मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी त्याला अटक केली. त्याच्या बँक खात्यातून या प्रकरणातील अन्य आरोपींच्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

विशेष मोक्का न्यायालयात शनिवारी त्याला हजर करण्यात आले. पैशांचा मूळ स्रोत शोधणे आणि व्यवहारांसाठी वापरण्यात आलेली डिजिटल साधने व ॲप्सची माहिती मिळविण्यासाठी त्याची कोठडी आवश्यक असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

त्यानुसार न्यायालयाने अमर मुंडिया याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अमर मुंडिया याने शूटर रेहान अन्सारी आणि अन्य आरोपींच्या खात्यांमध्येही लहान रकमा हस्तांतरित केल्याचे समजते.

अनिल पंडितचा शोध सुरूच

या प्रकरणात फरार असलेला अनिल पंडित हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. गोळीबाराच्या कटात त्याची भूमिका काय होती, आर्थिक व्यवहारांचे जाळे त्यानेच उभे केले होते का आणि अटक आरोपींना त्याच्याकडून पैसे मिळाले का, याचा तपास सुरू आहे.

१८ ऑक्टोबर रोजी जुहू येथे टायगर श्रॉफच्या कारवर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेत चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले होते. आतापर्यंत या प्रकरणात १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT