मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता आर्थिक व्यवहारांच्या दिशेने वळला आहे. हरियाणातील सोनीपत येथून मुंबई गुन्हे शाखेने अमन नावाच्या तरुणाला बारावा आरोपी म्हणून अटक केली आहे. त्याच्या बँक खात्यात फरार संशयित अनिल पंडित याच्याकडून पैसे जमा झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
अमनने ही रक्कम काढून शस्त्र पुरवठ्याचा आरोप असलेल्या कुणाल जमिनसिंग याच्याकडे दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या पैशांचा वापर गोळीबारासाठी वापरलेले तुर्की बनावटीचे झिगाना पिस्तूल मिळविण्यासाठी झाला होता का, याचा तपास सुरू आहे.
अमनला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणून पुढील तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
अमनच्या वैयक्तिक बँक खात्यात काही संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळले. अनिल पंडित याच्याकडून अमनच्या खात्यात पैसे जमा झाले होते. अमनने ही रक्कम काढून कुणाल जमिनसिंग याला दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. याशिवाय अन्य काही बँक खात्यांमधून पाच-पाच हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले.
पोलिसांच्या संशयानुसार, या आर्थिक व्यवहारांचा संबंध गोळीबारासाठी वापरलेल्या तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तूलच्या खरेदीशी असू शकतो. त्यामुळे शस्त्र खरेदीसाठी पैसे कोणी पुरवले, ते कोणत्या माध्यमातून पाठवले आणि प्रत्यक्ष शस्त्र पुरवठादारापर्यंत कसे पोहोचले, याचा शोध घेतला जात आहे.
गुरुवारी विशेष मोक्का न्यायालयाने यापूर्वी अटक केलेल्या अकरा आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या सुनावणीदरम्यान गुन्हे शाखेने आरोपींचे दोन स्वतंत्र गट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला. एका गटाकडे शस्त्रांची व्यवस्था करण्याची, तर दुसऱ्या गटाकडे प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्यांपर्यंत ती पोहोचविण्याची जबाबदारी होती, असा तपास यंत्रणेचा दावा आहे.
या संपूर्ण कटामागे फरार संशयित अनिल पंडित याची भूमिका काय होती, त्याने आर्थिक रसद पुरवली होती का आणि त्याचे परदेशातील कथित संपर्क या प्रकरणाशी संबंधित आहेत का, याचा शोध गुन्हे शाखा घेत आहे. अमनच्या अटकेमुळे गोळीबारामागील आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडण्यास मदत होण्याची शक्यता आहे.