Tiger Shroff Firing Case Pudhari
मुंबई

Tiger Shroff Firing Case: टायगरपूर्वी आमिर खान होता लक्ष्य? सुरक्षा भेदता न आल्याने कट बदलल्याचा संशय

आमिरच्या वांद्रेतील निवासस्थानाची तीन वेळा रेकी केल्याची माहिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील मोटारीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान बॉलीवूडमधील आणखी काही कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. टायगरपूर्वी अभिनेता आमिर खान हा हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता, अशी माहिती तपासात उघड झाल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.

आमिर खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाच्या परिसराची संशयितांनी तीन वेळा पाहणी केली होती. मात्र, त्याच्यापर्यंत पोहोचणे कठीण ठरल्याने हल्लेखोरांनी लक्ष्य बदलून टायगर श्रॉफवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टायगरच्या मोटारीवर १८ ऑक्टोबर रोजी जुहू परिसरात गोळीबार झाला होता. या घटनेत त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून बॉलीवूडमधील कलाकारांच्या निवासस्थानांची पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे.

आमिर खानच्या निवासस्थानासह सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही तपासाच्या संदर्भात उल्लेख झाला आहे. तत्पूर्वी,सलमानच्या निवासस्थानाबाहेरील कडक सुरक्षा पाहून हल्लेखोरांनी तो पर्याय सोडला असावा, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या कलाकारांना लक्ष्य करण्याच्या सूचना आरोपींना कोणी दिल्या होत्या का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

अमृतसर ते मुंबई शस्त्रपुरवठ्याचा संशय

या प्रकरणाचा तपास आता केवळ प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्यांपुरता मर्यादित नसून, शस्त्रे कोणी मिळवली, ती मुंबईत कोणी आणली आणि हल्लेखोरांपर्यंत कशी पोहोचवली, यावर गुन्हे शाखेचा भर आहे. शस्त्रपुरवठ्याशी संबंधित आरोपांवरून अटक करण्यात आलेल्या दोन पुरुषांसह दोन महिलांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने सोमवारी २८ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. कुणाल सिंह (२१), सुमित (१९), राधा वर्मा (२३) आणि बबिता राव (२३) अशी या चौघांची नावे आहेत.

तपासातील माहितीनुसार, शस्त्रे पंजाबमधील अमृतसर येथून आणण्यात आल्याचा संशय आहे. कुणाल आणि सुमित यांचा शस्त्रांची व्यवस्था करण्यात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. राधा आणि बबिता यांनी रेल्वेने शस्त्रे मुंबईत आणून ती संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यास मदत केल्याचा आरोप आहे. या चौघांचा आधी अटक केलेल्या आरोपींशी असलेला संपर्क, प्रवासाचा तपशील आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT