Mumbai local train violence pudhari photo
मुंबई

Mumbai local train violence : लोकलमध्ये जागेवरून तुफान राडा

परळ ते अंबरनाथ प्रवासात टोळक्याचा हल्ला; दोघा गंभीर जखमी प्रवाशांना मुंबईत हलविले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/डोंबिवली : परळ ते अंबरनाथ लोकलमधील मालवाहू डब्यात बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान आसनावर बसण्यावरून प्रवाशांच्या दोन गटांत तुफान राडा झाला. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या राड्यात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात हलविण्यात आले आहे. हल्लेखोरांनी मनगटात स्टीलचे कडे परिधान केले होते. या कड्यांच्या फटक्यांमुळेच हे प्रवासी जबर जायबंदी झाले.

या मारहाणीत प्रीतेश कनोजिया (३१), साहिल खंदारे (१९) आणि राजू वाघे (१९) हे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना आधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याणमधील रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर दोघांना सायन रूग्णालयात पाठविण्यात आले.

कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी तातडीने परेल-अंबरनाथ लोकलमधील हल्लेखोर प्रवाशांचा शोध सुरू केला आहे. रूग्णालयात जाऊन पोलिसांनी जखमी प्रवाशांकडून हल्लेखोरांची इत्यंभूत माहिती घेतली आहे. परळ ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

कड्याचे घाव घातले

बुधवारी रात्री परेल अंबरनाथ लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी होती. रात्रपाळीचे काम आटोपून आलेले बहुतांशी कर्मचारी/कामगार या लोकलने आपला अंबरनाथ दिशेकडील प्रवास सुरू करतात. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे या लोकलमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी होती. सामान्य डब्यात प्रवाशांची गर्दी असल्याने आणि रात्रीच्या सुमारास लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान मालवाहू डब्यात तपासणी किंवा गस्त ठेवत नसल्याने अनेक प्रवाशांनी मालवाहू डब्यात बसून प्रवास सुरू केला.

फलाट येईल त्याप्रमाणे लोकलमधील गर्दी कमी होत होती. ठाणे ते डोंबिवली दरम्यान दिव्यांग डब्यात आसनावर बसण्यावरून प्रवाशांच्या दोन गटांत शाब्दिक चकमकी झडल्या. सुरूवातीला हातवारे करत हे दोन्ही गट एकमेकांना धमकावत होते. मात्र डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आल्यावर दोन्ही गट अचानक आक्रमक झाले. एका गटाने मनगटावरील स्टीलच्या कड्याद्वारे आव्हान देणाऱ्या प्रवाशांना मारहाण सुरू केली. धारदार कड्याचा घाव डोक्यात बसल्याने तिन्ही प्रवासी घायाळ होऊन डब्यात कोसळले. दोन्ही गट एकमेकांना आक्रमकपणे भिडल्याने इतर प्रवासी मध्ये पडले नाहीत.

लोकलमध्‍ये हल्ल्याच्या वाढत्या घटना

परेल ते अंबरनाथ लोकलमधील हल्ल्याची घटना पाहता यापूर्वीही मुंबई लोकल ट्रेनमध्ये २३ जून २०२६ रोजी विरारच्या २२ वर्षीय मयंक लोहार यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अंधेरी आणि बोरीवली दरम्यान लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात पाऊस आल्याने दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादात आरोपीने मयंक यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला तर यापूर्वी पश्‍चिम रेल्वे मार्गावर प्रवाशाला चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. यातूनच रेल्वेतील प्रवास आता किती सुरक्षेचा यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाल आहे.

चर्चगेट-विरार लोकलमध्ये हाणामारी

चर्चगेट-विरार लोकल मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. अत्यंत खचाखच भरलेल्या गर्दीच्या डब्यात उभे राहण्याच्या जागेवरून तसेच गर्दीत धक्का लागल्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकल ट्रेनच्या पुरुषांच्या डब्यात हा वाद झाल्याचे दिसत आहे. मात्र,याबाबत पुढे काय कारवाई करण्यात आली याबाबत पश्चिम रेल्वेकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ 'चर्चगेट-विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी' या कॅप्शनने जोरदार व्हायरल केला जात आहे. किरकोळ वादाचे रूपांतर थेट लाथाबुक्क्या आणि शारीरिक मारहाणीत झाले. ट्रेनमधीलच एका सहप्रवाशाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये झालेल्या या राड्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या व्हिडिओ बाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाला विचारणा केली असता अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा रेल्वेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच रेल्वे पोलिसांनी पुढे काही कारवाई केली आहे का, याबाबत सुद्धा माहिती देण्यात आलेली नाही. मात्र प्रवाशांमधील हिंसक घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT