Sanjay Raut Bomb Threat: मुंबईतील भांडुप परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने थेट बॉम्बस्फोटाची धमकी दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
संजय राऊत हे कुटुंबासह भांडुप परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराबाहेर अनेक दिवसांपासून एक मोटारगाडी उभी होती. ही गाडी बराच काळ न हलवल्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती. याच धुळीवर अज्ञात व्यक्तीने अत्यंत धक्कादायक शब्दांत धमकीचा मेसेज लिहिला होता. “आजची रात्र संजय राऊत यांची शेवटची रात्र असेल, बॉम्बने उडवून देऊ,” अशा आशयाचा मजकूर या वाहनावर लिहिल्याचे निदर्शनास आले.
ही बाब बुधवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास एका शिवसैनिकाच्या लक्षात आली. संशयास्पद मजकूर दिसताच संबंधित कार्यकर्त्याने कोणताही विलंब न करता कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी सुरू केली.
सुरक्षेच्या दृष्टीने संजय राऊत यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक दाखल झाले. संपूर्ण परिसरात तपासणी करण्यात आली. मात्र, आतापर्यंत कोणतीही स्फोटक वस्तू किंवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून वाहनावर नेमके कोणी आणि कधी लिहिले, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकीय वातावरण तापलेले असताना अशा प्रकारच्या धमक्या अत्यंत गंभीर मानल्या जात आहेत.