NAINA Project Pudhari
मुंबई

NAINA Project: तिसऱ्या मुंबईत रोजगारांची मोठी संधी! १५ लाख नोकऱ्यांचे लक्ष्य, भूमिपुत्रांना प्राधान्य

नैना परिसराच्या विकासातून पाच लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्यांचे लक्ष्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूधारकांना मालमत्तापत्रांचे वाटप.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल.

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विकासाचे भागीदार बनविण्यासह आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे नैना परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी विकसित करण्यात आलेल्या एसबीआर-९, बीआर-४, बीआर-५ आणि उरण बायपास पूल या महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी भूधारकांना मालमत्तापत्रकांचे वाटपही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री भरत गोगावले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, अतुल पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र दळवी, पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरेश मेंगडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ विमानतळ नसून संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण घटक आहे.

भूधारकांच्या हातात जमिनीशी संबंधित कागदपत्रे दिल्यानंतरच विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गावनिहाय मोजणी, भूखंडांची ओळख, मालकी नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. भूधारकांचे प्रश्न सुटेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्रात मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशी विविध विकासकेंद्रे विकसित होत आहेत. याच धर्तीवर ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर हा परिसर आगामी काळात राज्याच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे इंजिन ठरेल. असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT