The foundation of opposition to Congress was laid in Maharashtra
मृणालिनी नानिवडेकर, मुंबई
आणीबाणीच्या निर्णयाला विरोध झाला तो उत्तरेत, गुजरातेत. महाराष्ट्र तुलनेने काँग्रेसमय. मात्र, घटनेतील तरतुदींचा वापर करत देशाला बंदीशाळा करणार्या या निर्णयाला मुंबई आणि परिसराने प्रचंड विरोध केला. या आर्थिक राजधानीने या सक्तीला विरोध केला तो कलेतून, साहित्यातून, विरोधी आंदोलनातून. एकीकडे किस्सा खुर्ची का, आंधी यासारखे चित्रपट अन् दुसरीकडे लोकसहभाग असलेली जनआंदोलने. महाराष्ट्र आधी रस्त्यावर उतरला आणि नंतर तुरुंग छोटे ठरवू लागला.
महाराष्ट्राचे राजकारण काँग्रेसी वळणाचे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा काँग्रेसचे गड. आणीबाणीची घोषणा इंदिरा गांधी यांनी केली ती गुजरात नवनिर्माण आंदोलनानंतरच्या घटनांचा परिमाण म्हणून. या घटनांची राजकीय धग महाराष्ट्रात फारशी पोहोचली नाही हे खरे, पण भाषण-लेखन स्वातंत्र्यावर गदा आणणार्या या निर्णयाला महाराष्ट्रातील विचारवंत, लेखक, कलावंत आणि नेत्यांनी कडाडून विरोध केला.
नरहर कुरुंदकरांसारख्या ज्येष्ठ विचारवंतापासून तर दिल्लीच्या राजकारणात त्या वेळी मोलाची भूमिका निभावणार्या मधु लिमये, मधु दंडवते यांनी स्वातंत्र्यसंकोच करणार्या या निर्णयाविरोधात जी मोर्चेबांधणी केली ती देशाच्या राजकारणाला वेगळे वळण देणारी ठरली. आणीबाणीत आवाज दाबला जातोय असा प्रचार सुरू झाल्यावर दमन हा सरकारचा हेतू नाही हे अधोरेखित करण्यासाठी साहित्य संमेलनाचे वार्षिक आयोजन करण्याचे ठरले.
नरहर कुरुंदकरांसारख्या ज्येष्ठ विचारवंतापासून तर दिल्लीच्या राजकारणात त्या वेळी मोलाची भूमिका निभावणार्या मधु लिमये, मधु दंडवते यांनी स्वातंत्र्यसंकोच करणार्या या निर्णयाविरोधात जी मोर्चेबांधणी केली ती देशाच्या राजकारणाला वेगळे वळण देणारी ठरली. आणीबाणीत आवाज दाबला जातोय असा प्रचार सुरू झाल्यावर दमन हा सरकारचा हेतू नाही हे अधोरेखित करण्यासाठी साहित्य संमेलनाचे वार्षिक आयोजन करण्याचे ठरले. अध्यक्षपद सर्वानुमते विदुषी दुर्गाबाई भागवत यांना सन्मानाने बहाल करण्यात आले.
महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळात त्यांचे कर्तृत्व मोठे. त्या लौकिकाला जागत त्यांनी कराड येथे झालेल्या त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात आणीबाणीला विरोध केला. या आंदोलनाचे कर्तेधर्तेपण जयप्रकाश नारायण यांच्याकडे होते. त्यांची तब्येत या काळात ढासळली होती. त्यांच्या तब्येतीला आराम मिळावा यासाठी दुर्गाबाईंनी ठराव मांडला आणि महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासह सर्व उपस्थित उभे राहिले. त्या काळातील या घटनेने महाराष्ट्राचे वैचारिक विश्व जागे ठेवले, अवघ्या जनांना असंतोषाचे अधिष्ठान दिले. साहित्य संमेलनातील त्यांची ही आग्रही भूमिका आजही थक्क करणारी मानली जाते.
मुंबई परिसरात त्या काळी समाजवादी नेतृत्व जोमात होते. जनसंघाचा प्रवाह हळुहळू मोठा होत होता. पुढे 90 च्या दशकात भाजपशी मैत्री झालेल्या जॉर्ज फर्नांडिस यांचे नेतृत्व त्या काळी मुंबईत तळपत होते. आणीबाणीला विरोध करण्यासाठी दोन वैचारिक धृवांवर असलेले समाजवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या काळात एकाच प्रतलावर आले ही महाराष्ट्रातील आणीबाणीची खरी मेख!
आणीबाणीच्या निषेधात उभ्या राहिलेल्या नागरिकांची धरपकड होऊ लागली. नाशिकचा तुरुंग व पुण्यातील येरवडा तुरुंग विचारस्वातंत्र्याची लढाई लढणार्यांचे विश्राम केंद्र झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची घोषणा करण्यापूर्वी बाळासाहेब देवरस यांना अटक केली. देवरस यांच्यापासून तर सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, पत्रकार प्रा.सुरेश द्वादशीवार, सुधीर जोगळेकर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर असे कित्येक तरुण या तुरुंगात परस्पर सहवासात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा तुरुंगात लागत असत. माणिकराव पाटील, प्रल्हाद अभ्यंकर, वसंतराव भागवत या ज्येष्ठांसमवेत त्या काळी गजांमागे असलेल्या प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी पुढे महाराष्ट्रात भाजपला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. प्रख्यात समाजवादी मधु लिमये यांनी लिहिलेल्या आठवणींच्या चार खंडात ज्येष्ठ हिंदुत्ववादी नानाजी देशमुख यांचा केलेला गौरवपूर्ण उल्लेख याबाबत महत्त्वाचा दस्तावेज ठरावा.
महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे महिलांनी आणीबाणीविरोधी लढ्यात दिलेले योगदान. मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, जयवंतीबेन मेहता, सुमतीताई सुकळीकर अशा रणरागिण्या इंदिरा गांधी यांच्या विचाराला विरोध करायला उभ्या झाल्या. आजही चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्यातल्या शोभाताई फडणवीस या आंदोलनाची आठवण काढतात. शंकरराव चव्हाणांसारखे ज्येष्ठ नेते त्या काळात महाराष्ट्र सांभाळत. नसबंदीची सक्ती ना महाराष्ट्राने अनुभवली ना खाली दक्षिणेने. मात्र, दमनकारी नीतीविरोधात समाज एकसंध होऊ शकतो, याची ज्वाला महाराष्ट्रात पेटली अन् पुढे तेवत नाहील.