विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसकडील अतिरिक्त मते ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनाच देण्याचे स्पष्ट निर्देश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.  Legislative Council Elections
मुंबई

काँग्रेसची अतिरिक्त मते ठाकरेंच्या नार्वेकरांनाच

पुढारी वृत्तसेवा
गौरीशंकर घाळे

मुंबई : विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसकडील अतिरिक्त मते ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनाच देण्याचे स्पष्ट निर्देश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यामुळे नार्वेकरांचा विजय निश्चित मानला जात असून शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील हे पराभवाच्या छायेत आले आहेत. काँग्रेसची अतिरिक्त मते ठरल्याप्रमाणे नार्वेकरांना मिळावीत, मतांचा पसंतीक्रम ठरल्यानुसारच राहिल याच्या मोर्चेबांधणीसाठी सोमवारी ठाकरे गटाचे नेते आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांची विधान भवनात बैठक झाली.

ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्यासह खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांच्यात बैठक झाली. काँग्रेसकडे 37 आमदार असून पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रज्ञा सावंत यांच्या विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा वापरल्यानंतरची शिल्लक मते मिलिंद नार्वेकरांना देण्याचे स्पष्ट निर्देश काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिली आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर, शरद पवार गटाने पुरस्कृत केलेले उमेदवार शेकापचे जयंत पाटील हे पराभवाच्या छायेत आले आहेत.

मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसारच प्रत्यक्ष मतदान होईल याची दक्षता घेण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रज्ञा सावंत यांच्या मतांचा कोटा निश्चित करण्यासाठी तसेच पसंतीक्रम नक्की करण्यासाठी आणखी एकदा दोन्ही पक्षांची बैठक होणार आहे.

येत्या 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचाच पराभव झाल्याने काँग्रेसची नाचक्की झाली होती. त्यामुळे काँग्रेसने आतापासूच सावधगिरी बाळगली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रज्ञा सातव यांना दगाफटका होणार नाही, यासाठी पक्षाकडून काळजी घेतली जात आहे. सोबतच काँग्रेसविरोधी अतिरिक्त मतेही सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यातील लढतीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निर्देशांमुळे नार्वेकरांची बाजू सुरक्षित झाली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये यादृष्टीने आधीच परस्पर सहकार्याचे धोरण निश्चित झाले आहे. या धोरणानुसारच मतदान होईल याची काळजी घेण्यासाठी विधानमंडळात दोन्ही पक्षांतील नेत्यांची बैठक झाली.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यात पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी देत राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली असून शरद पवार गटाने मात्र शेकापच्या जयंत पाटील यांना पुरस्कृत केले आहे. विधानसभेचे सध्याच्या संख्याबळानुसार साधारण 23 मतांचा कोटा प्रत्येक उमेदवारांना लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT