Thane Coastal Road Project Pudhari
मुंबई

Thane Coastal Road Project: ठाणे किनारी मार्गासाठी १० आय-गर्डर्सची एकाच दिवशी उभारणी

खारेगाव टोलनाका ते गायमुखदरम्यान १३.४५ किमीचा सहापदरी मार्ग; घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ठाणे किनारी मार्ग -१ प्रकल्पासाठी एकाच दिवशी १० आय-गर्डर्सची उभारणी करण्यात आली. बांधकाम क्षेत्रातील हा नवा विक्रम असल्याचे मानले जाते. १४ ऑक्टोबरला हा विक्रम करण्यात आला. खारेगाव टोलनाका ते गायमुख यांना जोडणारा हा १३.४५ किमी लांबीचा, सहा पदरी आणि प्रवेश-नियंत्रित मार्ग घोडबंदर रस्त्याला पर्यायी ठरणार आहे.

मालवाहतूक मार्ग म्हणून विकसित केल्या जाणाऱ्या ह्या प्रकल्पामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच मुंबई-नाशिक महामार्ग आणि ठाणे खाडी किनारपट्टीवरील गायमुखदरम्यानची जोडणी अधिक सक्षम होणार आहे.

खारफुटीच्या संवेदनशील परिसराचे संरक्षण करण्यासाठी या मार्गातील मोठा भाग हा पूल उभारून विकसित करण्यात येत आहे. यामुळे ठाणे, नाशिक, भिवंडी, गुजरात आणि उत्तर भारताच्या दिशेने जाणारी वाहतूक वेगवान होणार आहे.

या प्रकल्पात २४० मीटर लांबीचा खाडी पूल आणि खारफुटीच्या क्षेत्रातून जाणारा ८.११ किमी लांबीचा उन्नत रस्ता समाविष्ट आहे. ४० ते ४५ मीटर रुंदीचा विकास आराखडा रस्ता राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील स्थानिक आणि अंतर्गत शहरी वाहतुकीचे स्वतंत्रीकरण करण्यास मदत होईल.

ठाणे किनारी मार्ग - १ हा रस्ता गायमुख येथे प्रस्तावित गायमुख ते फाऊंटन हॉटेल बोगद्याशी थेट जोडला जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते भाईंदरदरम्यान अखंड जोडणी निर्माण होईल. हे दोन्ही प्रकल्प एकत्रितपणे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT