ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मुंबईतील वरळी डोम येथे मेळावा घेतल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे. ठाकरे बंधुंच्या या मनोमिलनानंतर मनसेने ठाण्यात बॅनर झळकवुन देवाभाऊ फडणवीस यांना धन्यवाद देत एक प्रकारे भाजपला डिवचले आहे.
हिंदी भाषेच्या सक्तीचा जीआर काढुन सरकारने मराठी भाषेचा आयता मुद्दा विरोधकांच्या हाती दिला होता. त्यावर सर्वप्रथम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यल्गार पुकारत मराठी माणसांचा भव्य मोर्चा काढण्याचे ठरवले होते. उद्धव ठाकरे यांनीही हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला. हिंदी सक्तीच्या विरोधात ५ जुलैला मराठी जनांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पावसाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेचा हा जीआरच रद्द केला. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधुनी ५ जुलैला मोर्चा ऐवजी विजयी मेळावा आयोजित केला. या भव्य मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, जे कुणाला जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले. शिवसेना प्रमुखांनाही जमले नाही पण फडणवीस यांनी दोन्ही ठाकरे बंधुंना एकत्र आणले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर ठाण्यामध्ये ठाकरें बंधु एकत्र येण्याचे बॅनर झळकू लागले आहेत.
मनसेचे ठाण्यातील शाखाध्यक्ष संतोष निकम आणि उपशाखा अध्यक्ष अक्षय आंबेरकर यांनी, "धन्यवाद देवाभाऊ... तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ..." अशा आशयाचे बॅनर सर्वत्र लावले आहेत. या बॅनरवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत. दरम्यान, मनसैनिकाच्या या बॅनरबाजीमुळे एक प्रकारे भाजपला लक्ष करण्यात येत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.