पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकांमध्ये मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यात जोरदार लढत झाली. या चुरशीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब यांनी पदवीधर संघामधून 44 हजार 784 अशा भरगोस मतांनी विजय मिळवला आहे.
मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.
ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना : 44 हजार 784 (विजयी)
किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी : 18 हजार 772
योगेश बालकदास गजभिये : 89
ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष : 39
ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष : 11
मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष : 464
रोहण रामदास सठोणे, अपक्ष : 26
ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) अपक्ष : 37
याचबरोबर मुंबई शिक्षक मतदारसंघातून पंचरंगी लढत झाली आहे. यामध्ये भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिंदेसेनाचे शिवाजी शेंडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) शिवाजी नलावडे, यांनी धुळ चारत उध्दवसेनेचे ज.मो. अभ्यंकर यांनी या पंचरंगी लढतीत विजय मिळवला आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे गटापुढे मोठे आव्हान होते. यंदा भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही.