मुंबई : नरेश कदम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच , शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत, तसेच पक्ष व चिन्ह कोणाचे याबाबत निकाल महापालिका निवडणुकीच्या पूर्वी येण्याचे संकेत आहेत. यात धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला न देता ते गोठविण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून होणार आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिंदे गट धनुष्यबाणावर लढणार की चिन्ह गोठविले जाणार? असा प्रश्न उभा होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून वेगळा गट स्थापन केल्यानंतर या विरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. 12 नोव्हेंबरपासून दोन-तीन दिवसांची सुनावणी होऊन अंतिम निकाल येईल, असे ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांकडून सांगितले जात आहे. पण आमदार अपात्रतेच्या निकालात आता कोणाला फारसा रस राहिलेला नाही. मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाणार की चिन्ह गोठविले जाणार याबाबत उत्कंठा आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर एकनाथ शिंदे यांनी, लोकसभा आणि विधानसभा 2024 च्या निवडणुका लढवल्या.त्याचा फायदा शिंदे गटाला झाला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर लढविण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आता शिवसेना पक्ष हे पुन्हा मिळावे , यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. पण त्यांना धनुष्यबाण या चिन्हात रस नाही. कारण त्यांचे मशाल हे चिन्ह घराघरात पोचले आहे. लोकसभा निवडणुकीत चांगले यश ठाकरे गटाला मिळाले . पण धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे राहिले तर त्याचा फायदा शिंदे गटाला मिळेल त्यामुळे हे चिन्ह गोठविण्यासाठी ठाकरे गटाची तयारी आहे.
निवडणुक चिन्ह गोठविण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे सर्वोच्य न्यायालय निवडणुक चिन्हाबाबत निर्णय घ्या, असे निवडणूक आयोगाला आदेश देवू शकते. त्यानंतर ठाकरे गट धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहे. निवडणूक चिन्हाबाबत वाद असेल तर ते चिन्ह आयोग गोठवते. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धनुष्यबाण चिन्ह गोठवले तर शिंदे गटाची पंचाईत होवू शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर येणारा सर्वोच्य न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे