Shivsena UBT Internal Survey BMC Election 2025 MNS Alliance
मुंबई : नरेश कदम
मराठी विजय मेळाव्यात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती होणार की नाही , हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी हे दोन बंधू एकत्र आले तर मुंबईत 100 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असे उद्धव ठाकरे गटाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. यात राज ठाकरे यांची मनसे 25 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा अंदाज आहे.
कोणत्याही निवडणुकीपूर्वी लोकधिकार समिती आणि काही खासगी कंपन्यांमार्फत ठाकरे गटाकडूनसर्व्हे केले जातात. यावेळी असे अंतर्गत सर्व्हे करण्यात आले आहेत. 2017 वगळता शिवसेनेची भाजपसोबत युती होती. 2012 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना 75, भाजपा 31 आणि मनसेने 28 जागा जिंकल्या होत्या. 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. तेव्हा शिवसेना 84, भाजपा 82 आणि मनसे 7 जागा जिंकल्या होत्या.
मराठी मते हा शिवसेनेचा मुख्य आधार आहे. पण ठाकरे गटाबरोबर शिंदे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सद्या मराठी मतांचे वाटेकरी आहेत. पण यात मनसे मुंबईत मोठा वाटेकरी आहे. त्यामुळे मराठी मतांसाठी उध्दव ठाकरे यांना मनसे सोबतची युती हवी आहे. त्यासाठी मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासह त्यांचे नेते मराठी मतांसाठी एकत्र राहिले पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडत आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाचे 10 आमदार 2024 च्या विधानसभा निवडून आले आहेत.
राज ठाकरे यांची राजकीय भूमिका अनाकलनीय असते. पण यावेळी मनसेचे कार्यकर्ते ठाकरे गटासोबतच्या युतीसाठी उत्सुक आहेत. ठाकरे गटाने प्रत्येक वॉर्डात सर्व्हे केला आहे. मराठी मते एकगट्टा पडली तर या दोन ठाकरे बंधूंची युती 100 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असे हा सर्व्हे सांगतो. मुंबईत असे 100 पेक्षा जास्त वॉर्ड आहेत तेथे मराठी मतांचे विभाजन झाले नाही तर या दोघांना 100 चा पल्ला पार करणे अवघड नाही, असे या सर्व्हेत स्पष्ट आहे.
उद्धव यांना मराठी मतांबरोबर मुस्लिम मते मिळतील. ही गुप्त समीकरणे मुंबई महापालिकेचे गणित बदलू शकतात. शिंदे गटाकडे ठाकरे यांचे 50 पेक्षा जास्त माजी नगरसेवक आले असले तरी हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ते निष्प्रभ ठरतील असे दिसत आहे.
गिरगांव, माझगांव, ताडदेव, लालबाग, परळ, भोईवाडा, दादर, माहिम, जोगेश्वरी, वांद्रे, मागठाणे, गोरेगांव, मुलुंड पूर्व, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी आदी भागात मराठी व्होट बँक मोठी आहे. या भागातून दोन बंधूंची युती झाली तर चांगल्या जागा मिळतील.
जर ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर सर्वाधिक नुकसान राज ठाकरे यांच्या पक्षाचे होईल. 10 जागांच्या आतच त्यांचा खेळ आटपू शकतो. तर उद्धव ठाकरे गट 60/65 च्या आसपास असेल. त्यामुळे त्यांना महापालिकेत सत्ता राखण्यात अपयश येईल.