

ठाणे : सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते. गृहमंत्री अमित शहा गुरुवारी दिल्लीत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट करीत उबाठाचे खासदार संजय राऊत यांना ठाणे मनोरुग्णालयात दाखल करायला हवे, असा टोला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी (दि.११) लगावला. याबरोबरच ठाकरे गटाला ऑगस्टमध्ये खिंडार पडेल, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले.
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट झाल्याचे सांगून शिंदे यांच्या दिल्लीवारीवर बोचरी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद देऊन राऊत यांच्या आरोपांचे खंडण करीत त्यांचा समाचार घेतला.
एकनाथ शिंदे यांचे नाव घेतल्याशिवाय संजय राऊतांना घशाखाली अन्न जात नाही. चर्चेत राहण्यासाठी वेड्यासारखे बरळतात, अशी टीका खासदार म्हस्के यांनी राऊत यांच्यावर केली. ते पुढे म्हणाले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा काल वाढदिवस होता. शिंदे दिल्लीत असल्याने त्यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. खासदार राऊत जेव्हा दिल्लीत असतात आणि गटनेत्यांच्या बैठकीला जात नाहीत. तेव्हा ते सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला, राहुल गांधी यांच्या घरी झाडू मारायला गेले होते, असे म्हणायचे का? अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. उबाठाचे पक्ष नेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्या पाया पडायला जातात का? याचे उत्तर राऊत यांनी द्यावे. राऊत यांनी उबाठा पक्षाचे वाटोळं केलं, अशी टीकाही खासदार म्हस्के यांनी केली.
मातोश्रीचे पावित्र्य ठाकरे गटाने नष्ट केलं. त्यामुळे गुरुपौर्णिमेला बाळासाहेबांना वंदन करायला लोक मातोश्रीवर फिरकले नाहीत, असे सांगत ऑगस्टमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडेल, असे भाकित खासदार म्हस्के यांनी यावेळी केले. महायुतीत कितीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी महायुती अभेद्य आहे, असा पुनरुच्चारही म्हस्के यांनी केला.