मुंबई: मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रविवारी (दि. ४) शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘विराट गर्जना मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाला काँग्रेस तसेच शरद पवार राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहभागी नागरिकांनी केवळ तिरंगा हातात घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव आणि राज ठाकरे यांनी केले आहे.
दुसरा संयुक्त मोर्चा
ठाकरे बंधूंचा हा दुसरा संयुक्त मोर्चा आहे. मागील मोर्चाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यावेळीही मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
मोर्चात कोणत्या घोषणा दिल्या जातात, कोणत्या मागण्या मांडल्या जातात आणि उद्धव-राज ठाकरे निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय पक्षांसोबत आता सर्वसामान्य जनतेचेही लक्ष लागले आहे.
मोर्चा यशस्वी होण्यासाठी मनसे आणि ‘उबाठा’ गटाने चांगली तयारी केली आहे. सकाळपासूनच मोर्चाच्या ठिकाणी कार्यकर्ते येण्यास सुरुवात होईल, असा दावा मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केला.
मेट्रो सिनेमा ते मनपा जाणार आजचा मोर्चा
मोर्चाची सुरुवात मेट्रो सिनेमापासून होणार आहे. सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होऊन तो मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाईल. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे.