मुंबई ः नरेश कदम
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. 227 जागांपैकी 70 च्या आसपास जागा मनसेला, तर शरद पवार गट या युतीत सामील झाला नाही, तर उद्धव ठाकरे गट 157 जागा लढवेल, अशी खात्रीलायक माहिती आहे. तथापि, शरद पवार गट 51 जागा मागत असून, ठाकरे बंधू 15 जागा देण्यास तयार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने मुंबईत बहुरंगी लढती रंगतील.
20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले असून त्यांच्या जागांचे वाटप कसे होते, हे उत्सुकतेचे आहे. राज आणि उद्धव यांच्यात आतापर्यंत वाटाघाटीच्या अनेकवेळा भेटीगाठी झाल्या आहेत. यातून जागावाटपाचे समीकरण पुढे आले आहे. मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी 70 च्या आसपास जागा राज ठाकरे यांच्या मनसेला जातील. तर उर्वरित 157 जागा ठाकरे गट लढेल.
मुस्लिम आणि दलित मतांची विभागणी होऊ नये, यासाठी काँग्रेसला या युतीत आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता; परंतु मुंबई काँग्रेसचे नेते स्वबळावर लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीनी त्यांना हिरवा कंदील दिला आहे. शरद पवार यांच्या गटाला ठाकरे बंधूंसोबत निवडणुका लढण्यात रस आहे, पण त्यांनी 51 जागांची मागणी केली आहे. तर त्यांना 15 जागा देण्यास ठाकरे बंधू तयार आहेत; मात्र ही ऑफर अजून शरद पवार गटाने स्वीकारलेली नाही. जर पवार गट वेगळे लढले, तर उद्धव ठाकरे गट आपल्याकडील काही जागा मनसेला देऊ शकतात.
बंडखोरीचा विचार करून जागांची अदलाबदल
मागील महापालिका निवडणुकीत ज्या जागा मनसे किंवा शिवसेनेने जिंकल्या आहेत त्या त्यांच्याकडे राहणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दोघांना मिळालेल्या मतांचा आधारही जागावाटपासाठी घेतला आहे. बंडखोरीचा विचार करून जागांची अदलाबदल केली आहे. मराठीबहुल भागांसह मुस्लिम, दलित, अमराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या भागात उद्धव ठाकरे यांनी जागा घेतल्या आहेत. शरद पवार गट काय निर्णय घेतो, त्यानंतर अंतिम निर्णय होईल.