मुंबई ः कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदे गटाशी केलेली सोयरीक उद्धव ठाकरे यांना पटलेली नाही. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे, तर शिंदे गटाशी अधिकृत युती करण्याची परवानगी दिली नसती, तर ते नगरसेवक शिंदे गटात गेले असते, असे स्पष्टीकरण राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या नाराजीवर दिल्याचे कळते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी चुरस सुरू आहे. एकीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे या महापालिकेच्या सत्तेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यक्षेत्र कल्याण-डोंबिवली आहे. त्यामुळे येथे स्वबळावर आपला महापौर करण्यासाठी लढाई सुरू आहे.
यात शिंदे यांनी भाजपला डिवचण्यासाठी मनसेशी संधान बांधले. यात मनसेचे माजी आमदार राजू पाटील सक्रिय आहेत. स्थानिक स्तरावर मनसेच्या नेत्यांनी निर्णय घेतला, असे सांगितले जात असले तरी त्यासाठी ‘शिवतीर्थ’वरून हिरवा कंदील घेतला होता. तसेच, मनसेचे मुंबईतील काही नेते हे शिंदे-मनसे सोयरीक घडवून आणण्यात गुंतले आहेत. आधीच तडजोडी करण्याचा शिक्का मनसेवर बसलेला आहे; पण दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी मराठी माणसांची अस्तित्वाची लढाई म्हणून मराठी मते मिळवली आणि तडजोडी सुरू झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत.
मनसेने शिंदे गटाशी केलेली सोयरीक उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागली आहे. भाजपपेक्षा शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे नंबर एकचे शत्रू आहेत. उद्धव यांचा नाराजीचा संदेश घेऊन खासदार संजय राऊत हे ‘शिवतीर्थ’वर गेले. त्यांनी संदेश दिला; पण माझ्या हातात काही नव्हते. हे स्थानिक स्तरावर झाले. एकनाथ शिंदे यांचा संदेश एका मध्यस्थाने राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला असल्याचे कळते.
ठाकरे गट विरोधी पक्षात बसणार
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 7 नगरसेवकांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या नगरसेवकांनी आम्हाला दोन्ही पक्षांकडून संपर्क साधला जात आहे आणि प्रस्ताव समोर ठेवले जात आहेत, याबद्दल नेमके काय करावे? याबद्दल विचारणा केली. उद्धव ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षात बसणार आहोत. मात्र, यामध्येसुद्धा तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू. मात्र, कुठलाही प्रस्ताव जरी आला तरी पक्षपातळीवर पक्ष यासंदर्भात निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.
मनसेच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता. मनसे, आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते, तर एक ताकदीचा विरोधी गट कल्याण-डोंबिवली महापालिकेत बसला असता, असेही उद्धव ठाकरे नगरसेवकांशी संवाद साधताना म्हणाले.
...मग कल्याण-डोंबिवलीत आमच्याशी युती का केली? : संजय राऊत
कल्याण-डोंबिवलीत मनसेला शिंदेसेनेला पाठिंबा द्यायचाच होता तर शिवसेनेशी (ठाकरे गट) युती का केली? अशा शब्दांत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, कल्याण-डोंबिवलीत जे घडले ती स्थानिक भूमिका असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र, राज ठाकरेंनाही ती भूमिका मान्य नाही हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आमच्या लक्षात आले. शिंदेंच्या बाबतीत आमची भूमिका कडवट आहे आणि ती राहील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिंदे हे एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करू शकतात, अशी परिस्थिती असताना इतरांना त्यामध्ये घुसायचे कारण नव्हते; पण त्यांनी तो निर्णय घेतला असून, यावर आम्ही पक्षांतर्गत चर्चा करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. मनसेच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांवर कारवाईची मागणीही राऊत यांनी यावेळी केली आहे.